नवी दिल्ली- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू असून, भारतात घातपात करण्याच्या तयारीत आहेत. अयोध्या, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, गुप्तचर यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तान लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने ईद-उल-फितरच्या नंतर जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्यासाठी 26 मे ते 29 मेदरम्यान 20 तालिबानी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले आहे,” असे एडव्हायजरीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांना अफगाणिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले आहे.परंतु देशाच्या सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे दहशतवादी त्यांचे षडयंत्र राबवू शकलेले नाहीत. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेत(एलओसी) 20 ते 25च्या संख्येने पाक सैन्य या प्रशिक्षित दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी मदत करू शकते, असेही या माहितीत म्हटले आहे. याशिवाय भारत-नेपाळ सीमेवरून पाक सैन्य पाच ते सहा दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याच्या तयारीत आहे. सुरक्षा एजन्सींचे म्हणणे आहे की, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणि ५ ऑगस्ट रोजी अनुच्छेद ३७० हटविण्याच्या वर्धापन दिनानिमित्त हल्ला होऊ शकतो. ते म्हणाले की, ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानेही अशा प्रकारच्या दुष्कृत्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुप्तचर यंत्रणांची ही संवेदनशील माहिती पाहता सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, संवेदनशील भागात हालचालींवर बारीक नजर ठेवणे आणि त्यांचे समन्वय साधण्यासाठी संबंधित एजन्सी आणि पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये पाकिस्तान लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने प्रशिक्षित केलेले दहशतवादी भारताच्या काही भागात हल्ले करण्याचा विचार करीत आहेत. सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढून एक वर्ष पूर्ण झाल्यावर आणि अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने हा हल्ला करण्याचा विचार करीत आहेत. कलम ३७० हा जम्मू-काश्मीरमधून गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता, तर ५ ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.
अफगाणिस्तानात पाक सैन्याने 20 तालिबानी दहशतवाद्यांना दिले प्रशिक्षण, भारतात घातपाताचा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 7:38 PM