मुंबई : आखातातील इराण-अमेरिका, इस्रायल युद्धाचे परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. मध्यपूर्वेतून होणारा ऊर्जा पुरवठा थांबल्यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारनेही ५ मार्चला अधिसूचना काढून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महानगरांसह राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांना फटका बसला. सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने आणि भीतीमुळे नागिकांनी देखील मंगळवारी गॅस पुरवठा केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.
मुंबईत गॅसचा मर्यादीत साठा
मुंबईतील अनेक भागात व्यावसायिक एलपीजीचा तुटवडा जाणत आहे. त्याचा जवळपास ५० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंटला थेट फटका बसणार आहे. त्यातच लहान रेस्टॉरंटकडे एलपीजी गॅसचा मर्यादीत साठा आहे. येत्या दोन दिवसात गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास अनेक रेस्टॉरंट तात्पुरती बंद करावी लागण्याची शक्यता आहे.
कामगार, व्यवसायिक संकटात
पुणे : शहरातील हॉटेल व्यवसाय प्रामुख्याने व्यावसायिक गॅसवर अवलंबून असल्याने या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो. घरगुती गॅससाठीही नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. पुणे शहरातील व उपनगरातील हॉटेल-रेस्टॉरंट व छोटे व मोठे व्यावसायिक असे ८ ते १० हजार हॉटेल व्यावसायिक आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली तर लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, असे हॉटेल -रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलिंग असोसिएशनने म्हटले आहे.
मोठ्या ऑर्डरला जातोय नकार
जळगाव : हॉटेल व्यावसायिकांकडे सद्यस्थितीत सरासरी दीड ते दोन दिवसांचा साठा आहे. मोठ्या ऑर्डरसाठी विचारणा करणाऱ्या ग्राहकांना स्पष्ट नकार द्यावा लागत आहे. जळगावमध्ये यवळपास १५० ते २०० हॉटेल्स व रेस्टॉरंट असून सध्या सिलिंडरचा जो साठा आहे, त्यावरच हॉटेल्स तग धरून आहेत.
इलेक्ट्रिक किंवा इंडक्शनवर स्वयंपाक करण्याचे पर्याय उपलब्ध असले तरी भारतीय पदार्थ जलद आणि जास्त आचेवर बनवावे लागतात. अशा प्रणालींकडे वळण्यासाठी मोठाखर्च लागतो प्रदीप शेट्टी, उपाध्यक्ष, हॉटेल अँड रेस्टॉरंट अससोसिएशन(वेस्टर्न इंडिया )
शासनस्तरावर याबाबत निर्णय झालेला आहे. साठवणूक, काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथके गठित करण्यात आली असून, त्यांच्याद्वारा मिशन मोडवर कार्यवाही होत आहे.आशिष येरेकर, जिल्हाधिकारी
४ हजार स्ट्रीट व्हेंडरवरही संक्रांत
नागपूर : शहरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुरवठ्याअभावी शहरातील ४ हजार स्ट्रीट व्हेंडरवरही संक्रांत आली आहे. अनेक रेस्टॉरंटने चूल पेटविली आहे. गेल्या ४ दिवसांपासून शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाला आहे. तेल कंपन्यांच्या प्लँटमधूनच माल येत नसल्याने एजन्सी संचालकांनी हात वर केले आहेत. सिलिंडरअभावी अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने बंद केली आहेत. रात्री ११ पर्यंत गजबजलेले स्टॉल्स आता रात्री ८ वाजताच बंद होत आहेत. ज्यांना दिवसाला १० ते १२ सिलिंडरची गरज आहे, त्यांना जेमतेम सिलिंडर मिळत आहे.
दोन दिवसांत २८०० उद्योग, ९२० हॉटेल्स बंद पडणार
छत्रपती संभाजीनगर : कमर्शियल गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर पुढील दोन दिवसांत येथील सुमारे २ हजार८०० उद्योग आणि सुमारे ९२० हॉटेल्स बंद पडणार असल्याची माहिती सीएमआयएने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. बहुतेक कंपन्यांकडील असलेला गॅसचा साठा दोन दिवसांत संपणार आहे.
शासनाने मंगळवारी परिपत्रक काढून एलएनजी वापराच्या ८० टक्के गॅस पुरवठा करण्याचे निर्देश दिले. हा इंडस्ट्रीसाठी दिलासा आहे. मात्र एलपीजी गॅस वापरकर्त्यां उद्योगांबाबत स्पष्टता नाही.
निहार ग्रुपच्या कंपन्या बंद
निहार ग्रुपच्या वाळूज येथील ७ युनिट्सच्या वतीने बजाज ऑटो, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, होंडा, टीव्हीएस, टोयोटा कंपन्यांना सुटे भाग पुरवठा करते. त्यासाठी १ मे. टन गॅसची गरज असते. पुरवठा खंडित झाल्याने दोन कंपन्यांचे उत्पादन थांबल्याचे महाव्यवस्थापक ए. के. सेनगुप्ता यांनी सांगितले.
गॅस बुकिंगसाठी तांत्रिक अडचणी
घरगुती गॅस बुकिंगसाठीदेखील अनेक तांत्रिक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. वितरण कंपनीकडून बुकिंगसाठी फक्त रिंग होते. तर तात्रिक संदेश पाठवून बुकिंग केले जात नाही. यामुळे स्वयपाकांचा घरगुती गॅस मिळवण्यात देखील अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या समस्या नागरिकांनी ‘लोकमत’कडे मांडल्या.
साठेबाजांवर कठोर कारवाई : जिल्हाधिकारी
पुणे शहर आणि जिल्ह्यात घरगुती गॅसच्या तुटवड्यानंतर साठेबाजी, काळाबाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या एजन्सी तसेच वितरकांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शहर व पिंपरी मिळून तीन पथके तर ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात एक पथक नेमण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर तसेच शहर स्तरावर स्वतंत्र दक्षता पथक नेमण्यात आली असून कठोर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र टुडे यांनी दिली.
५ हजार हॉटेल व्यावसायिकांना फटका; चिंतेचे वातावरण
सोलापूर : जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी पत्र काढून हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅसचा पुरवठा तत्काळ बंद करण्याचे आदेश गॅस कंपन्यांना दिले आहेत. या निर्णयाचा फटका सोलापूर शहर व जिल्ह्यातील सुमारे ५ हजार हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे. गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत पुरवठा पूर्णतः ठप्प राहिल्यास अनेक हॉटेल्स बंद ठेवावी लागतील, असे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
वितरणापेक्षा साठा जास्त, पॅनिक होऊ नका
कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरला प्राधान्य देण्यात आले असून, या सिलिंडरचा पुरेसा साठा जिल्ह्यासाठी येत आहे. तरीही नागरिक भविष्यात सिलिंडर मिळणार नाही म्हणून आताच एजन्सीसमोर रांगा लाऊन गॅस सिलिंडर नेत आहेत. बुकिंगनंतर नियमानुसार सिलिंडर नियमित घरपोहोच होईल. अफवांवर विश्वास ठेवून पॅनिक होऊन गॅस नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.
नाशकात काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके
नाशिक : घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बुकिंगवर २५ दिवसांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरचा संभाव्य काळाबाजार आणि व्यावसायिक सिलिंडरची चोरीछुप्या पद्धतीने होणारी विक्री रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली आहेत. कंपन्यांनी ऑनलाइन टेलिफोनिक बुकिंग, सुविधा ॲप्लिकेशनद्वारे किंवा व्हॉट्सॲप हेल्पलाइनद्वारे करण्यात येणाऱ्या नोंदणीवर सिस्टिम जनरेटेड ‘ब्लॉक’ लावला आहे. १४.२ कि.ग्रॅ वजनाच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता ९१६ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
Web Summary : Maharashtra faces LPG shortages due to Middle East tensions and supply restrictions. Hotels and businesses are struggling, with potential closures looming. Authorities are cracking down on hoarding. Gas booking issues worsen citizen woes.
Web Summary : मध्य पूर्व तनाव और आपूर्ति प्रतिबंधों के कारण महाराष्ट्र में एलपीजी की कमी। होटल और व्यवसाय संघर्ष कर रहे हैं, संभावित बंदी का खतरा मंडरा रहा है। अधिकारी जमाखोरी पर कार्रवाई कर रहे हैं। गैस बुकिंग के मुद्दे नागरिकों की परेशानियों को बढ़ाते हैं।