गांधींऐवजी नेहरुंना मारायला हवं होतं - भाजपा नेत्याचा वादग्रस्त लेख

By Admin | Updated: October 24, 2014 13:26 IST2014-10-24T13:26:36+5:302014-10-24T13:26:36+5:30

नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्याऐवजी जवाहरलाल नेहरु यांची हत्या करायला हवी होती असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळमधील 'केसरी' या मासिकात करण्यात आले आहे.

Instead of Gandhi, Nehru had to kill - controversial article of BJP leader | गांधींऐवजी नेहरुंना मारायला हवं होतं - भाजपा नेत्याचा वादग्रस्त लेख

गांधींऐवजी नेहरुंना मारायला हवं होतं - भाजपा नेत्याचा वादग्रस्त लेख

>ऑनलाइन लोकमत 
तिरुअनंतपुरम, दि. २४ - नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्याऐवजी जवाहरलाल नेहरु यांची हत्या करायला हवी होती असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळमधील 'केसरी' या मासिकात करण्यात आला आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्याने लिहीलेल्या या वादग्रस्त लेखावर केरळ काँग्रेसने आक्षेप घेतला असून केरळ सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. 
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'केसरी' मासिक हे मुखपत्र असून १७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या या मासिकामध्ये जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दात टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत चलागौडी येथील भाजपाचे उमेदवार बी. गोपाळकृष्णन यांनी हा लेख लिहीला आहे. नेहरुंच्या स्वार्थीवृत्तीमुळेच देशाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असून महात्मा गांधी यांच्या हत्येचेही हेच कारण होते. जर इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी निष्पक्षपणे फाळणीपूर्वीचा इतिहास व नथुराम गोडसे यांचे विचार याचा अभ्यास केला तर गोडसे यांनी चुकीचे 'टार्गेट' निवडले याची विद्यार्थ्यांना जाणीव होईल असे गोपाळकृष्णन यांनी म्हटले आहे. 
जागतिक नेता होण्यासाठी नेहरुंना गांधीजी हवे होते, त्यांचे नाव, टोपी व खादी या तिन्ही गोष्टी नेहरुंना हव्या होत्या. गोडसे नेहरुंपेक्षा चांगले होते. हत्येपूर्वी गोडसेंनी गांधीजींना नमस्कार केला होता. नेहरुजी तर समोर नमस्कार करायचे व मग पाठीत खंजीर खुपसायचे असे बेजबाबदार विधान गोपाळकृष्णन यांनी केले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण लेखात गोडसे हे संघाशी संबंधीत नव्हते असे वारंवार म्हटले आहे.  
दरम्यान, केरळमधील काँग्रेस नेत्यांनी लेखाविषयी आक्षेप घेतला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हिंदूत्वाचा मुद्दा पुढे केला जात आहे. एकीकडे  केंद्र सरकार नेहरुंची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी समिती नेमते व दुसरीकडे संघाच्या मुखपत्रात नेहरुंवर टीका केली जाते. मोदींनी हे सर्वप्रकार रोखायला हवे अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.  

Web Title: Instead of Gandhi, Nehru had to kill - controversial article of BJP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.