कुख्यात अण्णा राऊत फरारच
By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:10+5:302015-01-30T00:54:10+5:30
नागपूर : वाढदिवसाच्या दिवशीच प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करून हत्या करणारा कुख्यात अनिल ऊर्फ अण्णा राऊत हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा इकडे तिकडे शोध घेत आहे तर, तो काळ्या काचेच्या आलिशान वाहनातून फिरत असल्याची चर्चा आहे.

कुख्यात अण्णा राऊत फरारच
न गपूर : वाढदिवसाच्या दिवशीच प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करून हत्या करणारा कुख्यात अनिल ऊर्फ अण्णा राऊत हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस त्याचा इकडे तिकडे शोध घेत आहे तर, तो काळ्या काचेच्या आलिशान वाहनातून फिरत असल्याची चर्चा आहे. नरेंद्र व्यंकट पिंपळीकर (वय ३८, रा. रेवतीनगर, बेसा रोड) या प्रॉपर्टी डीलरचा रविवारी (२५ जानेवारी) वाढदिवस होता. कुटुंबीयांसोबत घरात तो वाढदिवस साजरा करीत असताना रात्री ८.३० च्या सुमारास कुख्यात अण्णा राऊतने आपल्या साथीदारासह त्याचे घर गाठले. पिंपळीकरला खाली बोलवून जबरदस्तीने आपल्या फॉर्चुनर कार (एमएच ३१/ ईएन ५१५१) मध्ये कोंबले. बनावट कागदपत्रे तयार करून पिंपळीकर आणि त्याचा साथीदार मांगिलाल या दोघांनी दुसऱ्याचा भूखंड अण्णाकडे गहाण ठेवला. त्या बदल्यात अण्णाकडून ९ लाख रुपये दोघांनी घेतले. ही बनवाबनवी उघड झाल्यामुळे संतप्त झालेल्या अण्णाने साथीदारांच्या मदतीने पिंपळीकरचे अपहरण केले आणि त्याचा अमानुष खून केला. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी आरोपींनी पिंपळीकरचा मृतदेह मेडिकलमध्ये नेऊन टाकला.हुडकेश्वर पोलिसांनी ज्योती (वय ३८) पिंपळीकर यांच्या तक्रारीवरून अण्णा राऊत आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून अण्णा फरार आहे. तो अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असून, काळ्या काचा लावलेल्या आलिशान वाहनातून इकडे तिकडे फिरत असल्याची चर्चा आहे. पाच दिवस होऊनही पोलीस त्याच्या मुसक्या बांधण्यात अपयशी ठरल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.कुख्यात अण्णावर अनेक गुन्हे दाखल असून, वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोल नाका लुटण्याच्या आरोपातून त्याची नुकतीच कोर्टातून निर्दोष सुटका झाली आहे. तत्कालीन सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांनी अण्णाचा बजाजनगरातील जुगार अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर त्याने आपले बस्तान अजनी आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हलविले. पोलिसांशी मधूर संबंध असल्यामुळे त्याचे अवैध धंदे बिनधास्त सुरू आहेत. ----