देशी बनावटीचे ‘तेजस’ हवाई दलात दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 04:46 IST2016-07-02T04:46:14+5:302016-07-02T04:46:14+5:30
भारतीय हवाई दलासाठी शुक्रवारचा दिवस मैलाचा दगड ठरला.

देशी बनावटीचे ‘तेजस’ हवाई दलात दाखल!
बंगळुरू : भारतीय हवाई दलासाठी शुक्रवारचा दिवस मैलाचा दगड ठरला. संपूर्णपणे देशात बनविलेल्या ‘तेजस’ या दोन हलक्या लढाऊ विमानांची (एलसीए) पहिली तुकडी हवाई दलात दाखल झाली. सरकारी मालकीच्या हिंदुस्थान एअरोनॉटिकल लिमिटेडने (एचएएल) पहिली दोन तेजस विमाने हवाई दलाच्या स्वाधीन केली.
या पहिल्या तुकडीचे नामकरण ‘फ्लाइंग ड्रॅगर्स’ असे करण्यात आले आहे. एअरक्राफ्ट सिस्टीम टेस्टिंग इस्टाब्लिशमेंट येथे हा कार्यक्रम झाला. कमांडिंग आॅफिसर गु्रप कॅप्टन माधव रंगाचारी यांनी तेजस विमान चालविले व विमाने दाखल करण्याच्या कार्यक्रमात त्याची सोर्टी सादर केली. या वेळी एअर मार्शल जसबीर वालिया, एअर आॅफिसर कमांडिंग इन चीफ, सदर्न एअर कमांड आणि एचएएलचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. हलक्या लढाऊ विमानांना विकसित करण्याचे ठरविल्यानंतर तीन दशकांनी संपूर्ण भारतीय बनावटीची लढाऊ विमाने कार्यरत झाली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ते पंतप्रधान असताना या विमानाचे नाव ‘तेजस’ ठेवले होते. या वर्षअखेर सहा आणि पुढील वर्षी आठ तेजस विमानांना दाखल करून घेण्याची हवाई दलाची योजना आहे. खूप जुन्या झालेल्या मिग-२१ विमानांच्या तुकडीची तेजस जागा घेतील. (वृत्तसंस्था)
>अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तेजस हवाई दलात दाखल होणे हा अतुलनीय अभिमानाचा आणि आनंदाचा भाग आहे. यातून भारतीय शास्त्रज्ञांचे कौशल्य आणि कुवतीचेही दर्शन घडते, अशा शब्दांत अभिनंदन केले.