ऑनलाइन लोकमत
ट्रेंटब्रिज (इंग्लंड), दि. ३० - एकदिवसीय मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने तिस-या सामन्यात इंग्लंडचा डाव २२७ धावांवर गुंडाळला असून विजयासाठी भारताला ५० षटकांमध्ये २२८ धावा करायच्या आहेत. रोहित शर्माच्या जागी अंबती रायडूला घेण्यात आले असून बाकीचा संघ तोच ठेवण्यात आला आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी करत ढोणीचा विश्वास सार्थ ठरवला. डावाला सुरुवात झाल्यापासून ठराविक अंतराने इंग्लंडच्या विकेट्स पडल्याने यजमानांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच मिळाली नाही.
आर आश्विनने तीन बळी टिपत महत्त्वाची भूमिका बजावली तर शामी, जाडेजा, रैना, भुवनेश्वरकुमार व रायडूने प्रत्येकी एक बळी टिपला. दोन फलंदाजांना भारतीय क्षेत्ररक्षकांनी धावचीत केले. सलामीवीर एलेस्टर कुकने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर हेल्स, बेल व बटलरने थोडाफार बरा खेळ करत इंग्लंडला दोनशेंची धावसंख्या पार करून दिली. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावणा-या बटलरने ५८ चेंडूंमध्ये ४२ धावा करत धावसंख्येला आकार दिला. भुवनेश्वरकुमारच्या शेवटच्या षटकात १७ धावा गेल्यामुळे इंग्लंडने २२५चा आकडा पार केला. मात्र या षटकांमध्ये २ गडी बाद झाल्याने धावसंख्या आणखी वाढली नाही आणि इंग्लंडचा डाव २२७ धावांवर आटोपला.