India's second lunar tour on July 15 | १५ जुलै रोजीभारताची चंद्रावरील दुसरी स्वारी!
१५ जुलै रोजीभारताची चंद्रावरील दुसरी स्वारी!

बंगळुरु : चंद्रावरील माती व वातावरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारताच्या ‘चांद्रयान-२’ या दुसऱ्या चांद्रमोहिमेसाठीचे यान १५ जुलै रोजी अंतराळात झेपावेल, असे इस्रोने बुधवारी जाहीर केले. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन यांनी सात आठवड्यांच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेची माहिती दिली. चांद्रयान-२साठी ‘जीएसएलव्ही-५ मार्क ३’ हा अग्निबाण श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ तळावरून १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केला जाईल. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात वैज्ञानिक संशोधनासाठीची साधने व उपकरणे असलेले ‘विक्रम’ हे लॅण्डर व ‘प्रग्यान’ ही गाडी (रोव्हर) ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविली जाईल.
दहा वर्षांपूर्वी भारताने ‘चांद्रयान-१’ मोहीम पूर्ण केली होती. आताची मोहीम प्रगत व तंत्रसिद्धतेने अधिक आव्हानात्मक असेल.

‘चांद्रयान-१’मध्ये चंद्रावर न उतरता ११ वैज्ञनिक उपकरणांनी चंद्राचा दुरुनच अभ्यास केला होता. आता ‘प्रग्यान’ला कुशीत घेऊन ‘विक्रम’ चंद्रावर उतरेल. नंतर ‘प्रग्यान’ चंद्रावरील दगड-मातीचे नमुने गोळा करेल. दूरवरून अभ्यास करूनही चंद्रावरील पाण्याचा शोध लावणे हा ‘चांद्रयान-१’चा यशाचा तुरा ठरला होता. आता त्याच गृहितकास बळकटी मिळण्याखेरीज चंद्राची नवी गुपितेही उघड होतील.

शिवन म्हणाले की, चंद्राभोवती ‘ऑर्बिटर’ने घिरट्या घालण्यापर्यंतचा टप्पा ‘चांद्रयान-१’ प्रमाणे असेल. तेथपर्यंतचे ‘मिशन’ याआधी यशस्वी झाले होतेच. आताच्या ‘मिशन’मधील लॅण्डर व रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचा शेवटचा १५ मिनिटांचा टप्पा पूर्णपणे नवा असल्याने काहीशी धास्ती निर्माण करणारा असेल. पण ‘इस्रो’चे कुशल वैज्ञानिक ही नवखेपणाची बाजीही फत्ते करतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत १४ प्रकारची वैज्ञानिक उपकरणे यानासोबत पाठविली जातील. ती ‘ऑर्बिटर’, ‘विक्रम’ हा लॅण्डर व ‘प्रग्यान’ हा रोव्हर या तिन्हीवर विखुरलेली असतील व ती एकाच वेळी निरनिराळे प्रयोग-चाचण्या करत राहतील. - के. शिवन, अध्यक्ष, इस्रो


Web Title: India's second lunar tour on July 15
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.