ओबामांनी अनुभवली भारताची सैन्यशक्ती
By Admin | Updated: January 28, 2015 05:35 IST2015-01-27T23:42:59+5:302015-01-28T05:35:39+5:30
राजधानीतील राजपथावर रिमझिम पावसाच्या साक्षीने आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत भारतीयांचा गौरव वाढविणारा

ओबामांनी अनुभवली भारताची सैन्यशक्ती
नवी दिल्ली : राजधानीतील राजपथावर रिमझिम पावसाच्या साक्षीने आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत भारतीयांचा गौरव वाढविणारा प्रजासत्ताक दिनाचा देखणा सोहळा सोमवारी अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी देशाने आपल्या सैन्यशक्तीसोबतच भारताच्या विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक वैभवाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या कार्यक्रमानिमित्त दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता.
देशाच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यास उपस्थित राहणारे ओबामा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. विशेष म्हणजे सकाळपासूनच सुरू असलेला पाऊस आणि बंदोबस्तानंतरही लोक मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले.
व्यासपीठावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उजवीकडे काळा सूट परिधान करून ओबामा विराजमान होते. तर डावीकडे मिशेल ओबामा बसल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा कोट आणि शिरावर तुर्रेदार राजस्थानी फेटा बांधला होता. सुमारे दोन तास चाललेल्या या पथ संचलनादरम्यान उभय नेत्यांमध्ये चित्ररथांबाबत माहितीची देवाणघेवाण सुरू होती.