ढाका दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड लपलाय भारतात?
By Admin | Updated: July 15, 2016 09:55 IST2016-07-15T09:47:04+5:302016-07-15T09:55:11+5:30
ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतात लपून बसला आहे असा दावा ढाका ट्रीब्युन या बांगलादेशी वर्तमानपत्राने केला होता.

ढाका दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड लपलाय भारतात?
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १५ - बांगलादेशात या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतात लपून बसला आहे असा दावा ढाका ट्रीब्युन या बांगलादेशी वर्तमानपत्राने केला होता. आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे परराष्ट्र सल्लागार गवाहर रिझवी यांनी सुद्धा कटाचा मुख्य सूत्रधार भारतात असल्याचे संकेत दिले आहेत.
बांगलादेशातून बेपत्ता असलेल्या युवकांसंबंधीची माहिती भारताला देणार असल्याचे रिझवी यांनी सांगितले. ढाक्यातील होली आर्टीसन बेकरी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हल्ल्याच्या सात महिने आधीच पश्चिम बंगालमध्ये निघून गेला होता असे ढाका ट्रीब्युनने आपल्या वृत्तात म्हटले होते. बंगाल पोलिस एमडी सुलेमानच्या शोधात आहेत. अबु अल मुसा अल बंगालीच्या चौकशीत सुलेमानचे नाव समोर आले होते.
दहा दिवसांपूर्वी मुसाला वर्धमान पोलिसांनी अटक केली होती. मागच्या दोन वर्षांपासून सुलेमान मुसाला निर्देश देत होता. बांगलादेशातून बेपत्ता असलेल्या युवकांसंबंधी आम्ही फाईल्स तयार करत असून या युवकांना शोधण्यात भारताने मदत करावी यासाठी आम्ही लवकरच त्या फाईल्स भारताला देऊ असे रिझवी यांनी सांगितले.
ढाका हल्ल्यातील तीन हल्लेखोर सधन कुटुंबातून आले होते. हल्ल्याच्या चार ते सहा महिने आधी ते बपेत्ता झाले होते. या प्रकरणी अधिक तपासात ढाक्यातून १०० युवक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली असून हे युवक विशीतील आहेत.