भारताचे यान बुधवारी मंगळाच्या कक्षेत

By Admin | Updated: September 22, 2014 03:11 IST2014-09-22T03:11:51+5:302014-09-22T03:11:51+5:30

४४० न्यूटन लिक्विड एपोजी मोटार (एलएएम) इंजिन गेल्या ३०० दिवसांपासून सुप्तावस्थेत आहे. त्याची किमान ४ सेकंदासाठी चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी

India's Mars Orbit | भारताचे यान बुधवारी मंगळाच्या कक्षेत

भारताचे यान बुधवारी मंगळाच्या कक्षेत

नवी दिल्ली : येत्या २४ सप्टेंबर रोजी भारताच्या मंगळ यानाने लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ‘इस्रो’ सोमवारी अतिशय महत्त्वपूर्ण अशा ‘चौथ्या पथ संशोधन कार्य’ आणि अंतराळ यानाच्या प्रमुख द्रवित इंजिनची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी सज्ज आहे.
४४० न्यूटन लिक्विड एपोजी मोटार (एलएएम) इंजिन गेल्या ३०० दिवसांपासून सुप्तावस्थेत आहे. त्याची किमान ४ सेकंदासाठी चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी
ठरली, तर मंगळ यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या यशस्वीतेबाबतचा इस्रोचा आत्मविश्वास अधिक वाढेल.
‘आम्ही चौथ्या पथ संशोधन कार्य आणि प्रमुख द्रवित इंजिनच्या प्रायोगिक चाचणीसाठी तयार आहोत. त्यासाठी अंतराळ यानाला कमांड (निर्देश) देण्यात आले आहेत आणि त्याची तपासणीही पूर्ण करण्यात आली आहे,’ असे इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ही घटना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण ३०० दिवसांपर्यंत निष्क्रिय पडून असलेल्या इंजिनला चाचणीसाठी पुन्हा सुरू केले जाणार आहे. एलएएम इंजिनची प्रायोगिक चाचणी ही एक परीक्षाच आहे. मंगळाची कक्षा भेदण्याच्या उद्देशाने या इंजिनला दीर्घकाळासाठी सक्रिय करावयाचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
या इंजिनची प्रायोगिक चाचणी ३.९६८ सेकंदांसाठी २.१४२ मीटर प्रति सेकंद वेगाने घेतली जाईल. त्यासाठी किमान ०.५६७ किलो इंधन खर्च होईल. मंगळ मिशन हे भारताचे पहिलेच आंतरग्रह मिशन आहे. हे मंगळ यान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील पोलर सॅटेलाईट लाँच व्हिकलच्या (पीएसएलव्ही) मदतीने प्रक्षेपित करण्यात आले होते. हे मंगळ यान बुधवारी लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ६६ कोटी ६० लाख कि.मी.च्या आपल्या प्रवासादरम्यान हे मंगळ अंतराळ यान १ डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या बाहेर पडले होते.
दरम्यान, सोमवारची योजना अपयशी ठरली, तर आपली दुसरी योजना (बी प्लान) तयार आहे. याअंतर्गत आठ प्रक्षेपकांना दीर्घकाळासाठी सोडले जाईल. त्यासाठी जादा इंधन लागेल आणि यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करू शकेल, असे इस्रोने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: India's Mars Orbit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.