भारतावर दुष्काळाची गडद छाया - विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन
By Admin | Updated: June 2, 2015 18:05 IST2015-06-02T18:00:00+5:302015-06-02T18:05:26+5:30
यंदा पाऊस सरासरी एवढा पडेल हा आधीचा अंदाज चुकीचा ठरण्याची शक्यता असून कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, असे भाकित खुद्द विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनीच वर्तविले आहे.

भारतावर दुष्काळाची गडद छाया - विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ०२ - यंदा पाऊस सरासरी एवढा पडेल हा आधीचा अंदाज चुकीचा ठरण्याची शक्यता असून कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, असे भाकित खुद्द विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनीच वर्तविले आहे.
याआधीच्या अंदाजानुसार सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. मात्र डॉ. हर्षवर्धन यांनी सुधारीत अंदाज ८८ टक्क्यांचा असल्याचे सांगितले. ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे दुष्काळी वर्ष मानण्यात येत असल्याने येणारे वर्ष भारतीयासांठी त्रासाचे ठरण्याची शक्यता आहे.
इतका कमी पाऊस पडल्यास देशातल्या अर्ध्या अधिक जमिनीला शेतीसाठीही पाणी मिळणार नाहीत, अशी भीतीही हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. हा सुधारीत अंदाज चुकीचा ठरू दे अशी प्रार्थना देवाकडे करुया अशी पुस्तीही विज्ञान मंत्र्यांनी जोडली आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या दरात आत्ताच वाढ होण्यास सुरुवात झाली असून त्यात दुष्काळाची भर पडली तर शेतक-यांचे जगणे कठीण होईलच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य माणूसही महागाईने जेरीस येईल. महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे हजारो शेतक-यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत, तिथे तर हा प्रश्न दुष्काळामुळे आणखीन उग्र होईल अशी भीती आहे.