Indians Unaccounted Wealth Abroad Estimated At Usd 216 490 Bn says Studies related with black money | परदेशात भारतीयांचा 'इतका' काळा पैसा; आकडा पाहून डोळे विस्फारतील
परदेशात भारतीयांचा 'इतका' काळा पैसा; आकडा पाहून डोळे विस्फारतील

नवी दिल्ली: परदेशी बँकांमध्ये जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची कायम चर्चा होते. परदेशातील बँकांमध्ये जमा असलेला काळा पैसा भारतात आणण्याचं आश्वासन भाजपानं 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलं होतं. आता परदेशी बँकांमध्ये असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाशी संबंधित काही आकडे समोर आले आहेत. ही आकडेवारी डोळे विस्फारुन टाकणारी आहे. 

1980 ते 2010 या कालावधीत देशातून जवळपास 246.48 अब्ज डॉलर (17,25,300 कोटी रुपये) ते 490 अब्ज डॉलर (34,30,000 कोटी रुपये) इतका काळा पैसा परदेशात गेल्याची आकडेवारी तीन दिग्गज संस्थांनी समोर आणली आहे. एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या तीन संस्थांनी काळ्या पैशाशी संबंधित आकडेवारी प्रसिद्ध केली. या तीन संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला एक अहवाल काल (सोमवारी) संसदेत मांडण्यात आला. रियल इस्टेट, खाणकाम, फार्मासिटीकल, पान मसाला, गुटखा, तंबाखू, चित्रपट, शिक्षण या क्षेत्रांमधून काळ्या पैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आलं. अर्थ विषयाशी संबंधित स्थायी समितीनं 'स्टेटस ऑफ अनअकाऊंटेड इन्कम/वेल्थ बोथ इनसाइड अँड आऊटसाइड द कंट्री-ए क्रिटिकल अ‍ॅनालिसिस' हा अहवाल सादर केला. काळा पैसा मोजण्याची कोणतीही सर्वमान्य पद्धत नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 'काही अंदाजांनुसार काळा पैसा मोजला जातो. आतापर्यंत समोर आलेले आकडे एका विशिष्ट पद्धतीच्या माध्यमातून समोर आलेले नाहीत. कारण यासंबंधी कोणतीही एक पद्धत अस्तित्वात नाही,' असं अहवाल सादर करताना समितीनं स्पष्ट केलं. समितीनं सादर केलेल्या अहवालात तीन संस्थांनी दिलेल्या काळ्या पैशाच्या आकडेवारीचा उल्लेख आहे. त्यापैकी नॅशनल काऊंसिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चनं (एनसीएईआर) 1980 ते 2010 या कालावधीत भारतातून 26,88,000 लाख कोटी रुपये ते 34,30,000 कोटी रुपयांचा काळा पैसा परदेशात गेल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंटनं (एनआयएफएम) 1990 ते 2008 या कालावधीत जवळपास 15,15,300 कोटी रुपये (216.48 अब्ज डॉलर) इतका पैसा देशाबाहेर गेल्याचा अंदाज वर्तवला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड फायनान्स या संस्थेनं 1997 ते 2009 या काळात देशाच्या एकूण जीडीपीच्या 0.2 ते 7.4 टक्के इतका पैसा परदेशात गेल्याचं म्हटलं आहे. 
 


Web Title: Indians Unaccounted Wealth Abroad Estimated At Usd 216 490 Bn says Studies related with black money
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.