Ministry External Affairs: गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग विभागलं गेलं आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या जळ इतर देशांनाही बसली आहे. भारतालाही या युद्धाचा फटका बसला आहे. रशियाने युक्रेनसोबत युद्ध करण्यासाठी विविध आकर्षणे दाखवत अनेक भारतीयांना सैन्यात दाखल करुन घेतलं होतं. मात्र रशियाने अनेक भारतीय सैनिकांना युक्रेनमध्ये लढण्यासाठी सोडून दिलं. त्यामुळे काही भारतीयांचा त्यामध्ये मृत्यू देखील झाला. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना रशियन सैन्यातील नोकरीच्या ऑफरपासून दूर राहण्याचे आवाहन केलं आहे.
रशियन सैन्यात सामील होण्याचा ऑफरबाबत परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक निवेदन जारी केले. यात भारतीयांना रशियन सैन्यात सेवा देण्याच्या ऑफर टाळण्याचे आवाहन केले जाते. सध्या रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या २७ भारतीय नागरिकांची माहिती असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान रशियन सैन्यात भरती होण्याच्या ऑफरबाबत परराष्ट्र मंत्रालय सतर्क आहे. मंत्रालयाने भारतीय नागरिकांना अशा ऑफरपासून दूर राहण्याचा सल्ला देणारी अनेक निवेदने जारी केली आहेत. गुरुवारीही परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले. तसेच रशियन सैन्यात धोक्याचे असल्याचे म्हटलं.
"आमच्या माहितीनुसार, सध्या २७ भारतीय नागरिक रशियन सैन्यात सेवा देत आहेत. या प्रकरणात आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या जवळच्या संपर्कात आहोत. आमच्या नागरिकांना सोडण्यासाठी आम्ही हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे. आम्ही पुन्हा एकदा सर्व भारतीय नागरिकांना रशियन सैन्यात सेवा देण्याच्या ऑफरपासून दूर राहण्याचे आवाहन करतो, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे," असं परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं.
दरम्यान, सरकारने यापूर्वी दिल्ली आणि मॉस्कोमधील रशियन अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांना या प्रकारची भरती प्रक्रिया बंद करण्याची विनंती केली आहे. मात्र भारतीयांना रशियन सैन्यात भरती करून युद्धक्षेत्रात पाठवण्यात आल्याच्या बातम्या पुन्हा एकदा समोर आल्या, ज्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाला कडक भूमिका घ्यावी लागली.