आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीत लक्षवेधी कामगिरी करणारी मनू भाकर हिला नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारने गौरवण्यात आले. या क्षणामुळे आनंदी असणाऱ्या भागर कुटुंबियावर रविवारी १९ जानेवारीला दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऑलिम्पिक क्वीन मनू भाकरचे मामा आणि आजी यांचे रस्ते अपघातात निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पीटीआयच्या वृत्तानुसार, हरयाणाच्या चरखी दादरीतील महेंद्रगड बायपास रोडवर झालेल्या अपघातात स्कूटी आणि ब्रेझा यांच्यात झालेल्या धडकेत मनू भाकरची आजी आणि मामा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ब्रेझाचा वाहन चालक फरार झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचेल. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
दोन दिवसांपूर्वीच ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदक विजेत्या मनू भाकर हिचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळाला होता. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी ऑलिम्पियन भारतीय नेमबाज मनू भाकर हिला पुरस्कार राशी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवित केले होते. २२ वर्षीय मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. या कामगिरीबद्दल सन्मान झाल्यावर घरात आनंदाचं वातावरण असताना तिच्या घरी दु:खद घटना घडली आहे. मनूची आजी आणि मामा स्कूटीवरून जात असताना हा अपघात घडला. पोलिस फारर झालेल्या चालकाचा शोध घेत आहेत.