ऑनलाइन टीम
जोधपूर, दि. ९ - राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथकाने गुरुवारी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला अटक केल्याची माहिती वरीष्ठ अधिका-याने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजता प्रतापनगरमध्ये असलेल्या लाला लजपत कॉलनीमध्ये सापळा रचून झाकीर (३०) या दहशतवाद्याला अटक केली. तसेच त्याला विमानाने जयपूरला अधिक चौकशीकरता नेण्यात आल्यावर पुन्हा जोधपूर येथे आणण्यात आले. येथील स्थानिक कोर्टासमोर त्याला हजर केले असता कोर्टाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. झाकीर हा राजस्थानमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचे जाळे पसरवण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वी १ मे रोजी तामिळनाडू येथे इंडियन मुजाहिद्दीनचाच आतंकवादी अश्रफला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून झाकीरबद्दल माहिती मिळाल्याने पोलिसांना झाकीरला अटक करण्यात यश आले.