पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २३ वर्षीय शेतकरी अमृतपाल सिंह हा चुकून पाकिस्तानात गेला, त्याला आता पाकिस्तानमधील न्यायालयाने एक महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अमृतपालचे वडील जुगराज सिंह यांनी याबाबत माहिती दिली. अमृतपालच्या वडिलांनी केंद्र आणि पंजाब सरकारला त्यांच्या मुलाला भारतात परत आणण्यासाठी योग्य पावलं उचलण्याची विनंती केली आहे.
अमृतपाल सिंह हा फिरोजपूर जिल्ह्यातील खैरेच्या उत्तर गावातील रहिवासी आहे. तो २१ जून रोजी भारत-पाक सीमेजवळील त्याचं शेत पाहण्यासाठी गेला होता, जे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) देखरेखीखाली 'राणा' या सीमा चौकीजवळ काटेरी कुंपणाच्या पलीकडे आहे. संध्याकाळी ५ वाजता सीमा गेट बंद होणार होतं पण अमृतपाल परतला नाही. तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे.
अमृतपालकडे सुमारे ८.५ एकर जमीन आहे, जी भारतीय सीमेवर आहे. बीएसएफ जवानांना पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या काही पाऊलखुणा आढळल्या, ज्यामुळे तो अनवधानाने सीमा ओलांडून गेला असल्याचा संशय आणखी बळावला. २७ जून रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफला माहिती दिली की, अमृतपाल स्थानिक पोलिसांच्या ताब्यात आहे.
जुगराज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना समजलं की त्यांच्या मुलाविरुद्ध पाकिस्तानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि २८ जुलै रोजी त्याला एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ५०,००० रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. जर हा दंड भरला नाही तर त्याला आणखी १५ दिवसांची शिक्षा भोगावी लागेल. वडिलांनी सरकारला आपल्या मुलाच्या लवकर परत आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे.