पाकमधून आलेल्या हिंदूंसाठी भारतीय बँकांची कवाडे खुली
By Admin | Updated: July 15, 2015 16:49 IST2015-07-15T15:21:46+5:302015-07-15T16:49:42+5:30
पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू निर्वासितांसाठी आता देशात बँक खातं उघडण्याची व जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळू शकते.

पाकमधून आलेल्या हिंदूंसाठी भारतीय बँकांची कवाडे खुली
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून आलेल्या हिंदू निर्वासितांना मोदी सरकारकडून मोठा दिलासा मिळणार असून या हिंदूंना भारतीय नागरिकत्वाशिवाय देशात बँक खातं उघडण्याची व जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
'इतर देशांमध्ये छळ सहन कराव्या लागणा-या हिंदूंचे रक्षण करणे आमची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांना आपण वा-यावर सोडणार नाही' असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. सत्तेवर आल्यावर मोदींनी वचनपूर्तीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तातून आलेल्या हिंदूना मोदी सरकारतर्फे भारतीय नागरिकत्व देण्यात येत असून गेल्या वर्षभरात ४ हजारांहून अधिक हिंदूना नागरिकत्व मिळाले आहे, युपीए-२ सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हे प्रमाण एक हजार इतकेच होते. याशिवाय पाकमधील निर्वासित हिंदूना व्हिसा व फॉरेनर रजिस्ट्रेशन ऑफिसने (एफआरओ) जारी केलेल्या परवान्याच्या आधारावर बँक खाते उघडता येईल.
पाकिस्तानमध्ये हिंदू नागरिकांना सहन करावा लागलेला छळ, त्यांच्या झालेल्या हाल-अपेष्टांमुळे त्यांना भारतात या सुविधा देण्यास भारत सरकार पुढाकार घेत आहे. तसेच पाकिस्तानामधील या निर्वासितांना आरबीआयच्या मंजुरीशिवाय सामान्य नागरिकांप्रमाणेच बँक खाते उघडता येऊ शकेल. सध्याच्या नियमांनुसार, भारताबाहेरील कोणत्याही देशात राहणारी व्यक्ती 'एनआरओ' अकाऊंट उघडू शकते, मात्र पाकिस्तान व बांग्लादेशमधील नागरिकांना हे खातं उघडायचे असेल तर रिझर्व्ह बॅकेंची मंजुरी आवश्यक असते. पण मोदी सरकार मात्र पाकिस्तानमधील हिंदू निर्वासितांना या छाननीतून सूट देण्याच्या विचारात असून ते या नियमाला अपवाद ठरण्याची शक्यता आहे.