मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या २७ शालेय विद्यार्थ्यांना सैन्याने सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. पावसाने थैमान घातले आहे. 'रायझिंग सोल्स स्कूल'मधून घरी परतत असताना ही सर्व मुलं बसमध्ये अडकली होती.
सिंध नदीच्या वाढत्या पाण्याची पातळी आणि तीव्र प्रवाहामुळे हे विद्यार्थी पचावली गावाजवळ बसमध्ये अडकले होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रशासनाने सैन्याची मदत घेतली आणि सुमारे ३० तासांच्या प्रतीक्षेनंतर मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
मुलांची स्कूल बस सुकुंडयाई, बिजरौनी आणि जवळच्या गावांमध्ये परतत होती. पचावली गावाजवळ सिंध नदीत अचानक पाणी वाढल्याने पूल ओलांडणं अशक्य झालं. कोलारसचे एसडीओपी संजय मिश्रा म्हणाले की, पूल ओलांडण्यात धोका असल्याचं पाहून बस तिथेच थांबवण्यात आली.
प्रशासनाने घेतली सैन्याची मदत
परिस्थिती बिकट होत चालली आहे हे पाहून प्रशासनाने सैन्याची मदत घेतली. लष्कराचे एक पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बोटीतून एकामागून एक मुलांना वाचवलं. सुमारे ३० तासांपासून अडकलेल्या मुलांनी सुखरूप बाहेर पडल्यानंतर 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या.
कुटुंब झालं भावुक
मुलांना वाचवल्यानंतर त्यांचं कुटुंब भावुक झालं आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. घटनास्थळी पोहोचलेले कोलारसचे आमदार महेंद्र यादव यांनी सैन्य आणि प्रशासनाचे आभार मानले. हवामानाची परिस्थिती पाहूनच वाहतुकीचा निर्णय घेण्याचा इशारा प्रशासनाने शाळांनाही दिला.
१०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
भारतीय सैन्यानेही पुरात अडकलेल्या अनेक गावकऱ्यांना वाचवले. लष्कराने ट्विटरवर माहिती दिली की, 'शिवपुरी, गुना आणि अशोकनगर जिल्ह्यात सैन्य, एसडीआरएफ आणि प्रशासन सातत्याने मदत आणि बचावकार्य करत आहे. आतापर्यंत १०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. तीन पूर मदत पथकं आणि तीन वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत, जी चोवीस तास बाधितांना मदत करत आहेत.