नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली आहे. चीनी सैन्य त्यांच्या कुरापती कमी करण्यास तयार नाही, त्याला भारतीय सैन्यानेही चोख उत्तर दिले आहे. पूर्व लडाख प्रदेशातील पँगौंग तलावाजवळ चीनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या विश्वासघातकी डावाला भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलएसीमधील तणावपूर्ण वातावरण पाहता भारतीय सैन्याची विकास रेजिमेंट बटालियन उत्तराखंड येथून पँगौंग तलावाच्या दक्षिणेकडच्या भागात तैनात करण्यात आली होती. या बटालियनने वास्तविक नियंत्रण रेषेवरील(LAC) ज्याठिकाणी भारतीय क्षेत्राकडे दुर्लक्ष केले होते, तेथील एका उंच पठाराच्या जागेवर कब्जा केला आहे.
चीनचा असा दावा आहे की, हे क्षेत्र त्यांच्या हद्दीत आहे. ही जागा बळकावण्यासाठी चीनची करडी नजर होती. कारण या क्षेत्रावर कब्जा करणाऱ्याला तलाव आणि त्याच्या आसपासच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यात रणनीतीनुसार फायदा होऊ शकतो. चीनच्या या नियोजनाची माहिती भारतीय लष्कराला होती. अशा परिस्थितीत चीनकडून कोणतेही पाऊल उचलण्याआधी भारतीय लष्कराकडून सैनिकांची एक तुकडी याठिकाणी तैनात करावी असा निर्णय घेण्यात आला. सीमेवरील विवादाचा तोडगा काढण्यासाठी ब्रिगेडच्या कमांडर स्तरावरील बैठकी यापूर्वीच चुशुल आणि मोल्दो येथे घेण्यात आल्या आहेत, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.
भारताकडून ठाकुंगजवळील भूदलाने लढाऊ वाहने व टाक्यांसह शस्त्रे या उंच पठाराजवळ नेण्यात आली आहे. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांमध्ये भारतीय अधिकारी तसेच विकास रेजिमेंट अंतर्गत काम करणाऱ्या तिबेटींचाही समावेश आहे.
नेमके काय झाले?
पँगौंग सो सरोवरात स्वहद्दीत चिनी सैनिकांनी तळ ठोकला आहे. पूर्वस्थितीनुसार आपल्या क्षेत्रात नियंत्रणरेषेच्या कक्षेत थांबण्याची भारताची मागणी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भारताने हीच मागणी कायम ठेवली. चीननेही वेळोवेळी त्यास सहमती दर्शवली. राजनैतिक, लष्कर, परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत मागे हटण्याची तयारी दाखवली. संपूर्णपणे स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय चर्चा निष्फळ ठरेल, असे भारताने वारंवार बजावले.
२९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते ३० ऑगस्टच्या पहाटेपर्यंत सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैनिकांनी बांधकाम आरंभले. साधारण ५०० सैनिक होते, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. जवानांनी त्यास विरोध केला. शक्तिप्रदर्शन केले. शारीरिक इजा दोन्ही बाजूंनी कुणासही झाली नाही. जवानांनी मानवी भिंत तयार केली व युद्धस्थितीतील कवायती केल्याचा दावा सूत्रांनी केला. ड्रॅगनच्या कावेबाजपणाचा अंदाज असल्याने जवान सज्ज होते. त्यामुळे चिनी सैनिकांना मागे हटावे लागले.
भारताने गेल्या दोन महिन्यांमध्ये ड्रॅगनची दुखरी नस दाबली आहे. चिनी मालावर अप्रत्यक्ष बहिष्कार, शेजारील राष्ट्रांशी व्यापारविषयक करारावर निर्बंध लावताना भारताने चीनला वेळोवेळी समज दिली. चीनचा कावेबाजपणा सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख, भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी चीनला वेगवेगळ्या शब्दांत भारताचा इरादा सांगितला. चीनने आतापर्यंत वेळकाढूपणा कायम ठेवला आहे.