नवी दिल्ली - भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.
कुठे केले हल्ले?
- बहावलपूर - आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास १०० किमी अंतरावरील हे ठिकाण असून तिथे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होते, जे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.
- मुरीदके - हे दहशतवादी ठिकाण बॉर्डरपासून ३० किमी अंतरावर होते, तिथे लश्कर ए तोयबाचे सेंटर होते, जे २६/११ मुंबई हल्ल्याशी जोडले होते.
- गुलपूर - हे दहशतवादी ठिकाणी LOC पासून ३५ किमी अंतरावर होते.
- लश्कर कॅम्प सवाई - पीओकेच्या तंगाधार सेक्टरच्या ३० किमीवर अंतरावर हे ठिकाण होते.
- बिलाल कॅम्प - जैश ए मोहम्मदचं लॉन्चपॅड, हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरले जायचे
- कोटली- एलओसीपासून १५ किमी अंतरावरील लश्कर ए तोयबाचा कॅम्प, याठिकाणी ५० हून अधिक दहशतवादी ट्रेनिंग घेत होते
- बरनाला कॅम्प - LOC पासून १० किमी अंतरावर हे ठिकाण आहे
- सरजाल कॅम्प - सांबा कठुआच्या समोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून ८ किमी अंतरावर जैशचं प्रशिक्षण केंद्र होते
- मेहमूना कॅम्प - हे हिज्बुल मुझाहिद्दीनचे प्रशिक्षण सेंटर होते, जे बॉर्डरपासून १५ किमी अंतरावर होते.
भारताच्या स्ट्राईकवर पाकिस्तानी पंतप्रधानाचे उत्तर
भारताने केलेल्या मध्यरात्री हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची झोप उडाली. शरीफ यांनी सोशल मीडियावर निवेदन जारी करत पाकच्या जमिनीवर शत्रूने हल्ला केल्याचे म्हटले. पाकिस्तान युद्ध लादण्याच्या या कृत्याला उत्तर देण्याचा अधिकार आहे. हे उत्तर दिले जाईल. पाकिस्तानी सैन्य आणि जनता एकजूट आहे असं त्यांनी सांगितले.