चिनी पाणबुडीच्या श्रीलंकेतील मुक्कामामुळे भारत सतर्क
By Admin | Updated: September 28, 2014 13:01 IST2014-09-28T13:00:11+5:302014-09-28T13:01:35+5:30
लडाख येथे घुसखोरी करुन भारताला आव्हान देणा-या चीनने आता समुद्री मार्गाद्वारेही भारताला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसते.

चिनी पाणबुडीच्या श्रीलंकेतील मुक्कामामुळे भारत सतर्क
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - लडाख येथे घुसखोरी करुन भारताला आव्हान देणा-या चीनने आता समुद्री मार्गाद्वारेही भारताला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या श्रीलंकेदौ-यापूर्वी तब्बल नऊ दिवस चीनच्या नौदलाची पाणबुडी श्रीलंकेतील कोलंबो येथे मुक्कामाला असल्याची माहिती भारतीय नौदलाला मिळाली आहे. हा भाग भारताच्या दृष्टीने अति संवेदनशील भाग आहे.
बंगालच्या उपसागरापासून ते हिंद महासागरापर्यंत चिनी नौदलाच्या पाणबुड्यांचा नेहमीच वावर असतो व भारतीय नौदलानेही या पाणबुड्यांना नेहमीच ट्रॅक केले आहे. मात्र ७ ते १४ सप्टेंबर दरम्यान चिनी नौदलाची साँग क्लास ही डिझेल - इलेक्ट्रीक पाणबुडी श्रीलंकेतील कोलंबो येथील आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल येथे मुक्काम ठोकून होती. या घटनेने भारतीय नौदल यंत्रणा चक्रावून गेली होती. ज्या भागामध्ये चिनी पाणबुडी होती तो भाग भारताच्या दृष्टीने अति संवेदनशील विभाग आहे. या भागात आत्तापर्यंत कधीही चिनी पाणबुड्या आलेल्या नव्हत्या. विशेष म्हणजे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या श्रीलंका दौ-याच्या वेळीच ही पाणबुडी कोलंबोत ठाण मांडून होती.
चीनचे नौदल ग्रीन वॉटर फोर्सपासून ब्लू वॉटर फोर्समध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहे. यानुसार चिनी नौदल केवळ चीनच्या सागरी किना-यांचेच नव्हे तर खोल समुद्रातही स्वतःची अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील नवनियुक्त मोदी सरकारचे सागरी व भू सीमा सुरक्षेविषयक धोरण काय आहे हे तपासण्यासाठी चीनने या कुरापाती सुरु केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चीनचे पूर्व आफ्रिका, मॉरिशस, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार व कंबोडियाशी सागरी संबंध असून सागरी रस्त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठीच चिनी नौदलाने आता हिंद महासागरात आक्रमक धोरण राबवल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हिंदी महासागरातील चिनी पाणबुडीने मुक्काम ठोकल्याने भारताच्या नौदल यंत्रणाही सतर्क झाल्या असून चिनी पाणबुड्या व नौदलाच्या वावरावर भारताची करडी नजर आहे. चीनला उत्तर देण्यासाठी नौदल सक्षम असल्याचे नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. तर ही पाणबुडी सागरी चाच्यांवर कारवाईसाठी जात होती. इंधन भरण्यासाठी ही पाणबुडी कोलंबोतील सागरी किना-यावर थांबली होती असे स्पष्टीकरण चीनने दिले आहे.