लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भक्कमपणे भारताच्या पाठीशी असल्याची हमी त्यांनी दिली. पहलगाम हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शासन करून न्याय व्हायलाच हवा, असे पुतिन म्हणाले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करून म्हटले आहे की, पुतिन यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून निर्दोषांच्या झालेल्या हत्येबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. रशियन वकिलातीनेही याबाबत म्हटले आहे की, हा हल्ला अत्यंत घृणास्पद असल्याचे पुतिन यांनी नमूद केले. शिवाय, कोणतीही तडजोड न करता दहशतवादाविरुद्ध लढण्यावर भर दिला.
या संवादादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पुतिन आणि रशियातील जनतेला दुसऱ्या महायुद्धातील विजयाबद्दल ९ मे रोजी रशियात साजऱ्या होणाऱ्या ‘विजय दिनाच्या’ ८० व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
पुतिन यांना भारतभेटीचे निमंत्रणया वर्षी भारतात होत असलेल्या दोन्ही देशांतील वार्षिक शिखर बैठकीत सहभागी होण्यासाठी मोदी यांनी पुतिन यांना खास निमंत्रण दिले. पुतिन यांनीही ते तत्काळ स्वीकारले. भारताशी धोरणात्मक सहकार्यावर भर देताना या संबंधांवर ‘बाहेरील’ दबावाचा कधीही परिणाम झाला नसल्याचे पुतिन यांनी या चर्चेत अधोरेखित केले.
संरक्षण सचिवांनी घेतली पंतप्रधानांची भेटभारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी पंतप्रधानांना भेटल्यानंतर एका दिवसात ही बैठक झाली व सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केल्याचे समजते.
‘फतह’ क्षेपणास्त्राची ‘प्रशिक्षण चाचणी’इस्लामाबाद : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताबरोबर वाढत्या तणावादरम्यान, पाकिस्तानने सोमवारी १२० किमी पल्ल्याची ‘फतह मालिका’ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी ‘प्रशिक्षण चाचणी’ केली. लष्कराच्या मीडिया विंग ‘इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने एका निवेदनात म्हटले आहे की, ही चाचणी सध्या सुरू असलेल्या ‘सिंधू’ सरावाचा भाग म्हणून करण्यात आली. या चाचणीचे उद्दिष्ट सैन्याची ऑपरेशनल तयारी सुनिश्चित करणे, क्षेपणास्त्राची प्रगत मार्गदर्शन प्रणाली आणि अचूकता यासह प्रमुख तांत्रिक बाबी पाहणे होते.