पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरातच्या दौऱ्यावर आले आहेत. गांधीनगरला रोड शो करत त्यांनी महात्मा मंदिरच्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर मोठे आवाहन केले. सर्जिकल स्ट्राईकवेळी पुरावे मागणाऱ्या विरोधी नेत्यांनाही मोदींनी चांगलेच सुनावले आहे. यावेळी त्यांना पुरावे द्यावे लागणार नाहीत, कारण यावेळी देव पुरावे देत आहे, असा टोला मोदी यांनी लगावला.
आपण अजून फारसे काही केलेले नाही पण त्यांना आताच घाम फुटला आहे. सध्या आम्ही आमची धरणे स्वच्छ करत आहोत यामुळे तिकडे पूर येत आहे. आमचे कोणाशीही वैर नाही, आम्हाला सर्वांचे कल्याण हवे आहे. शरीर कितीही निरोगी असले तरी, एक काटा सतत वेदना देऊ शकतो. म्हणून आम्ही तो काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. फाळणीच्यावेळी भारत माता दोन भागांत विभागली गेली. तेव्हा काश्मीरवर पहिला दहशतवादी हल्ला झाला होता. जर तेव्हाच या दहशतवाद्यांना संपविले असते तर आज पहलगाम घडले नसते. ७५ वर्षांचे हे दुःख टाळता आले असते, असे मोदी म्हणाले.
साखळदंड तोडायला हवे होते, पण हात तोडले गेले. देशाचे तीन भाग झाले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानने मुजाहिदीनच्या नावाखाली दहशतवाद्यांच्या मदतीने भारतमातेचा एक भाग काबीज केला. जर सरदार पटेलांचा सल्ला मान्य केला असता आणि या सर्वांना संपविले असते तर आज ही वेळच आली नसती, असे मोदी म्हणाले.
६ मे च्या रात्री मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या मृतदेहांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सलामी दिली. यावरून दहशतवादी कारवाया हे काही प्रॉक्सी युद्ध नाही तर पाकिस्तानची विचारपूर्वक केलेली युद्धनीती आहे. आता तुम्हाला तसेच उत्तर मिळेल, असा इशारा मोदी यांनी दिला. ६ मे रोजी रात्री लष्करी सामर्थ्याच्या मदतीने ऑपरेशन सिंदूर सुरू झाले आणि आता हे ऑपरेशन लोकांच्या शक्तीच्या मदतीने पुढे जाईल. आपण कोणत्याही विदेशी वस्तू वापरणार नाही, याची शपथ घ्या. दुर्दैवाने गणपतीची मूर्तीही परदेशातून येऊ लागली आहे. तुम्ही तुमच्या घरी जा आणि या बाहेरच्या देशात बनलेल्या कोणत्या वस्तू वापरता याची यादी बनवा. विदेशी वस्तू खरेदी करणार नाही अशी शपथ घ्या, तरच ऑपरेशन सिंदूर यशस्वी होईल, असे मोदींनी लोकांना आवाहन केले. यावेळी मोदींचा रोख चीनकडे होता.