भारत पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या टप्प्यातच - हाफिज सईदची धमकी
By Admin | Updated: January 16, 2016 09:29 IST2016-01-16T09:26:49+5:302016-01-16T09:29:37+5:30
भारत आणि इस्रायल पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या टप्प्यातच आहेत, असा धमकीवजा इशारा मुंबई हल्ल्याच्या सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने दिला.

भारत पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या टप्प्यातच - हाफिज सईदची धमकी
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १६ - भारत आणि इस्रायल पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या टप्प्यातच आहेत, असा धमकीवजा इशारा मुंबई हल्ल्याच्या सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने दिला आहे. कराचीमध्ये एका सभेला संबोधित करताना त्याने हे वक्तव्य केले. एवढेच नव्हे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर तैनात करत असल्याचा दावा करत त्याने मोदींवरही निशाणा साधला.
एकीकडे पाकिस्तान भारताशी चर्चा करण्याची, पठाणकोट हल्ल्याशी संबंधितांवर कारवाई करण्याची भाषा करत असतानाचा दुसरीकडे हाफिज सईदने हा धमकीवजा इशारा दिला आहे. या भाषणात त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरही टीका केली आहे.
यापूर्वीही हाफीज सईदने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर व इतरांना ताब्यात घेतल्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या सरकारवर टीका केली होती. 'भारताला खुश करण्यासाठीच पाकिस्तान सरकारने ही कारवाई केली आहे' असा आरोप त्याने केला होता.