भारत अतिरेक्यांचे लक्ष्यच
By Admin | Updated: December 18, 2014 05:18 IST2014-12-18T05:18:48+5:302014-12-18T05:18:48+5:30
भारत दीर्घकाळापासून अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या अतिरेक्यांच्या कोणत्याही

भारत अतिरेक्यांचे लक्ष्यच
नवी दिल्ली : भारत दीर्घकाळापासून अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या अतिरेक्यांच्या कोणत्याही कटाबाबत गुप्तचर यंत्रणाकडे विशिष्ट अशी माहिती उपलब्ध नाही, अशी कबुली गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली. खा. विजय दर्डा यांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता.
अल-कायदाच्या शेख अयाम अल जवाहिरी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ३ सप्टेंबर २०१४ रोजी अपलोड करण्यात आला होता. त्यात भारतीय उपखंडात अल-कायदाची ‘एक्यूआयएस’ ही नवी शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. २९ जून १४ रोजी इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेल्या अन्य एका व्हिडिओत अबू बकर अल बगदादी याने भारतासह विविध देशांमधील मुस्लिमांची कथित दुर्दशा मांडली होती. विविध अतिरेकी संघटना भारताच्या कानाकोपऱ्यात स्फोट घडविण्याची धमकी देत आल्या आहेत. अशा संघटनांची ओळख पटवण्यात आली काय? बर्दवान स्फोटाचा गुंता सुटला आहे काय? या स्फोटांमधील दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली? असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.
त्यावर चौधरी म्हणाले की, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या स्फोटाचा तपास करीत आहे. आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले, जखमी झालेले लोक जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशचे (जेएमबी) सदस्य होते.