नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लावल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे आणि लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया थांबविल्याचा दावा एका अहलावाच्या आधारे करण्यात आला आहे. मात्र, या वृत्ताचे संरक्षण मंत्रालयाने खंडन केले आहे. केंद्र सरकारच्या तीन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिल्याचे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले होते. त्यामुळे या संदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वृत्तात म्हटले होते की, अमेरिकेने लादलेल्या वाढीत आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भारताने ही खरेदी प्रक्रिया थांबविली आहे.
मात्र, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेशी संरक्षण संसाधनांची खरेदी थांबविण्याच्या चर्चेत कोणताही अडथळा आलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे आणि बनावट आहे.
पंतप्रधान मोदी यांची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. या नेत्यांनी भारत-रशिया संबंध मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले की, अध्यक्ष पुतिन यांच्याशी माझी चांगली व सविस्तर चर्चा झाली. या वर्षाच्या अखेरीस पुतिन यांच्या भारत भेटीची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे.
डोभाल यांनी घेतली होती पुतिन यांची भेट : गुरुवारीच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी मॉस्को येथे पुतिन यांची भेट घेतली होती, हे येथे महत्त्वाचे. सुरक्षा, आर्थिक आणि ऊर्जा सहकार्यावरील द्विपक्षीय चर्चेसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
.............टॅरिफचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चर्चा नाही : ट्रम्पन्यूयॉर्क/वॉशिंग्टन : जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.व्हॉईट हाऊसमधील ‘ओव्हल ऑफिस’मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. अमेरिकेने भारताविरुद्ध ५० टक्के टॅरिफ लावल्यामुळे आता दोन्ही देशांतील व्यापार वाटाघाटी गतिमान होतील का, या प्रश्नावर ट्रम्प यांनी म्हटले की, ‘अजिबात नाही. जोपर्यंत हा मुद्दा (टॅरिफ) सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही वाटाघाटी होणार नाहीत.’
ट्रम्प यांनी आधी २५ टक्के टॅरिफची घोषणा केली. ७ ऑगस्टपासून ते लागूही झाले आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी अजून २५ टक्के टॅरिफ लावले. त्यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ ५० टक्के झाले आहे.
अन्यायकारक, अनुचित : भारतभारतीय वस्तूंवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक, अनुचित आणि अयोग्य आहे. भारत राष्ट्रीय हित जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.