भारत सहिष्णुतेच्या पायावर उभा -दलाई लामा
By Admin | Updated: November 16, 2015 00:17 IST2015-11-16T00:17:27+5:302015-11-16T00:17:27+5:30
भारतातील लोकांचा अद्यापही शांतता आणि बंधुतेवर विश्वास आहे. ताज्या बिहार विधानसभा निवडणुकीने यावर शिक्कामोर्तबच झाले आहे, असे मत तिबेटचे श्रद्धास्थान असलेले दलाई लामा यांनी व्यक्त केले.

भारत सहिष्णुतेच्या पायावर उभा -दलाई लामा
नवी दिल्ली : भारतातील लोकांचा अद्यापही शांतता आणि बंधुतेवर विश्वास आहे. ताज्या बिहार विधानसभा निवडणुकीने यावर शिक्कामोर्तबच झाले आहे, असे मत तिबेटचे श्रद्धास्थान असलेले दलाई लामा यांनी व्यक्त केले. देशातील वाढत्या असहिष्णुतेवरून रान पेटले असतानाच दलाई लामांनी हे वक्तव्य केल्याने भाजपच्या भुवया उंचावल्या. याउलट काँग्रेस व जदयूने लामांच्या उपरोक्त वक्तव्याला पाठिंबा दर्शवला.
शनिवारी जालंधरस्थित लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पाचव्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी बोलताना लामांनी बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केले. काही समस्या असू शकतात; पण भारत धर्मनिरपेक्षता व सहिष्णुतेच्या पायावर उभा आहे. बहुसंख्य हिंदूंना शांतता व सौहार्द प्रिय आहे. बिहारातील ताज्या निवडणूक निकालांनी हे सिद्ध केले आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले.
रविवारी काँग्रेस व जदयू या पक्षांनी लामांच्या या वक्तव्याची पाठराखण केली. लामांनी सद्य:स्थितीत एकदम योग्य टिप्पणी केली, असे काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद म्हणाले. जदयू सरचिटणीस के.सी. त्यागी यांनीही लामांच्या वक्तव्याचे स्वागत केले. लामांचे वक्तव्य हे देशात असहिष्णुतेला वाव देणाऱ्यांना सडेतोड उत्तर आहे, असे ते म्हणाले. याउलट लामांच्या वक्तव्यावर भाजपचा तिळपापड झालेला दिसला. दलाई लामा एक धार्मिक गुरू आहेत. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क