भारताने मालदीवला विमानाने पाठविले पाणी
By Admin | Updated: December 6, 2014 00:00 IST2014-12-06T00:00:55+5:302014-12-06T00:00:55+5:30
जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने मालदीवच्या राजधानी मालेत तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली

भारताने मालदीवला विमानाने पाठविले पाणी
माले/नवी दिल्ली : जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने मालदीवच्या राजधानी मालेत तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली असून, भारताने तेथील लाखाहून अधिक लोकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी आज हवाई दलाच्या विमानासह नौदलाच्या जहाजाद्वारे पाणी पाठविले.
या संकटावर मालदीवचे नागरिक आणि सरकारला संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी दिले आहे, असे मालेतील भारतीय उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. उभय देशांतील मैत्रीपूर्ण, घनिष्ठ आणि मजबूत संबंध लक्षात घेऊन भारताने मालदीवच्या पाणी पाठविण्याच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत तत्परतेने पाणी पाठविले. मालदीवचे संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षामंत्री कर्नल (निवृत्त) मोहंमद नाझीम यांनी भारतीय विमानाचे स्वागत केले. भारताने तातडीने दिलेल्या मदतीबद्दल संरक्षणमंत्री नाझीम यांनी भारताचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. माले जल आणि मलनिस्सारण कंपनीच्या एका जनरेटर कंट्रोल पॅनलला ४ डिसेंबर रोजी आग लागली होती. या आगीमुळे शुद्धीकरण प्रकल्पाच्या जनरेटरची केबल खाक होऊन पाणीपुरवठा ठप्प झाला. मालेत सध्या केवळ टाक्या आणि हौदांमध्ये साठवून ठेवलेले पाणि उपलब्ध असून ते दर १२ तासाला एकदा पुरविण्यात येत आहे. हे शहर हिंद महासागरातील सखल बेटावर वसलेले असून येथे एकही नैसर्गिक जलस्रोत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना संपूर्णपणे प्रक्रिया केलेल्या समुद्रातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)