नवी दिल्ली - भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरबाबत आणखी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत सैन्याचे जवान दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. भारतीय लष्कराने त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करून प्लॅनिंग केलं, ट्रेनिंग घेतले आणि एक्शन केली, न्याय झाला असा कॅप्शन दिला आहे. ऑपरेशन सिंदूरपाकिस्तानसाठी असा धडा आहे जो त्याने कित्येक दशके शिकला नव्हता असं सैन्याने म्हटलं आहे.
सैन्याने त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात म्हटलंय की, याची सुरुवात पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून झाली. हा राग नव्हता ज्वाला होती. डोक्यात फक्त एकच गोष्ट होती. यावेळी असा धडा शिकवायचा जो अनेक पिढ्या लक्षात राहील. बदल्याची भावना नव्हती तर न्याय होता. ९ मे रोजी रात्री ९ वाजता शत्रूने ज्या पोस्टवरून सीजफायरचे उल्लंघन केले त्या सर्व पोस्ट भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या. ऑपरेशन सिंदूर केवळ एक कारवाई नव्हती तर पाकिस्तानसाठी असा धडा होता जो त्यांनी दशकापासून शिकला नाही असंही म्हटलं आहे.
७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर लॉन्च
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ६-७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. त्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. या हल्ल्यात दहशतवादी तळ निस्तनाबूत झाले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेजवळील नागरी वस्तीत ड्रोन, मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय सैन्याने त्याला सडेतोड उत्तर दिले.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान-भारत यांच्यात तणाव आणखी वाढला. त्यानंतर पाकिस्तानकडून सीजफायरची विनंती केल्यानंतर भारताने त्यास मान्यता दिली. १० मे रोजी संध्याकाळी भारत-पाकिस्तान यांच्या युद्धविरामची घोषणा करण्यात आली. मात्र तोपर्यंत भारतीय सैन्याकडून पाकिस्तानचे मोठे नुकसान केले होते. भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानातील सैन्य एअरबेसला टार्गेट करण्यात आले. त्यात प्रमुख एअरबेस उद्ध्वस्त झाले.