India-Pakistan Tension :पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हे अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी अमेरिकेतून भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली. दरम्यान, आता भारतानेपाकिस्तानच्या भडाकवणाऱ्या विधानांवर आक्षेप घेतला आहे.
जर पाकिस्तानने काहीही करण्याचे धाडस केले तर त्यांना मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल असे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अलिकडच्या काळात पाकिस्तानने केलेले विधाने अपयशांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सुप्रसिद्ध पद्धतीचा भाग असल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पाकिस्तानी नेतृत्वाने भारताविरुद्ध दिलेल्या बेपर्वा, युद्धखोर आणि द्वेषपूर्ण वक्तव्यांबद्दलचे अहवाल आम्ही पाहिले आहेत.
आपले अपयश लपवण्यासाठी वारंवार भारतविरोधी विधाने करणे ही पाकिस्तानी नेतृत्वाची एक सुप्रसिद्ध पद्धत आहे', असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
'तर पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल'
गुरुवारी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका ब्रीफिंगमध्ये सांगितले की, पाकिस्तानला त्यांच्या वक्तव्यात संयम बाळगण्याचा सल्ला दिला जाईल, कारण कोणत्याही चुकीच्या कृतीचे दुःखद परिणाम होतील, जसे की अलीकडेच दिसून आले आहे.
अमेरिकेची भारताला नवी धमकी
शुक्रवारी अलास्का येथे होणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले. पण, अमेरिकेने या बैठकीचा संबंध भारत आणि टॅरिफ वॉरशी जोडला आहे. या बैठकीवरुन अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी भारताला धमकी दिली. जर ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यातील चर्चा अयशस्वी झाली तर अमेरिका भारतावर अधिक टॅरिफ लादेल, अशी धमकी त्यांनी दिली.