India-Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने काल भारतातील अनेक शहरांवर ड्रोनने हल्ला केला. पण, भारतीय सैन्यानेही पाकिस्तानचे हल्ले परतून लावले. दरम्यान, पीडीपी प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, 'भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सीमेच्या दोन्ही बाजूंनी निष्पाप लोकांचे जीव घेत आहे. या कठीण काळात संयम आवश्यक आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी आणि लष्करी कमांडरनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकत्र येऊन शांततापूर्ण तोडगा काढणे, तसेच जीवित आणि मालमत्तेचे आणखी नुकसान टाळणे महत्त्वाचे आहे.'
'तुम्हा सर्वांना भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीची माहिती आहेच. सीमेवरील लोक, महिला आणि मुले बेघर होत आहेत. दोन्ही बाजूंनी असे नागरिक मारले जात आहेत, ज्यांनी कधीही या कारवाईचे समर्थन केले नाही. पुलवामा असो किंवा पहलगाम, दोन्ही घटनांनी आपल्याला धोक्याच्या उंबरठ्यावर आणले आहे. यावर उपाय काढणे गरजेचे आहे.' हे बोलत असताना मेहबूबा मुफ्ती भावुक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.