भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात हाय अलर्टचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमेजवळील मुघलानी कोट गावातील एका शेतातून पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष सापडले आहेत, ज्यावरून स्पष्ट होते की पाकिस्तान आता ड्रोनद्वारे भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी शेतात एक संशयास्पद वस्तू पाहिल्याची माहिती बीएसएफला दिली, त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. तपासात असे दिसून आले की, हा अवशेष एका पाडलेल्या पाकिस्तानी ड्रोनचा होता, जो भारतीय सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या हवेतच हल्ला करून जमिनीवर पाडला.
ड्रोन पाकिस्तानचाच!
पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मुगलानी कोट गावातील एका शेतातून हा संशयास्पद ड्रोनचा मलबा सापडला आहे. सुरुवातीच्या तपासात हे सिद्ध झाले आहे की, हा मलबा एका पाकिस्तानी ड्रोनचा आहे, जो भारतीय सुरक्षा दलांनी पाडला होता. बीएसएफने तात्काळ शोध मोहीम सुरू केली आणि ड्रोनचा मलबा ताब्यात घेतला. या परिसरात आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क!
पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत, विशेषतः पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या या कुरापती सुरू आहेत. भारत-पाकमध्ये सध्या तणाव वाढला असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत. अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई केली जात आहे.