India Slams Pakistan: जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्यासपीठावरुन भारताने दहशतवाद आणि खोट्या प्रचाराच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय राजदूत अनुपमा सिंग यांनी पाकिस्तानवर थेट हल्लाबोल करताना म्हटले की, पाकिस्तान अजूनही जिहादी दहशतवादाचे केंद्र आहे. पाकिस्तान दहशतवादाला पोसतो, पाकिस्तान दहशतवादाला जन्म देतो आणि स्वतः पीडित असल्याचे भासवतो.
अनुपमा सिंग यांनी WHO सारख्या जागतिक व्यासपीठाचा वापर करून खोटं बोलून व्हिक्टिम कार्ड खेळल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली. त्या म्हणाल्या की, दहशतवादी हल्ल्यांचे प्रायोजक आणि आयोजक थेट पाकिस्तानी भूमीतून काम करतात. पाकिस्तान जिहादी दहशतवादाचे केंद्र आहे. पाकिस्तानच दहशतवादाला पोसतो आणि स्वतः पीडित असल्याचे जगाला भासवतो. पाकिस्तान सिंधू पाणी कराराबाबतही वारंवार खोटा प्रचार करतोय, अशी टीका त्यांनी केली.
भारत जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणारजम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करत शेकडो दहशतवाद्यांना ठार केले. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. अलिकडचे दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शविली आहे. पण, त्यानंतर पाकिस्तान जगभरात स्वतःला पीडित म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तानचे खोटेपणा उघड करण्यासाठी भारत जगातील अनेक देशांमध्ये आपले प्रतिनिधी पाठवणार आहे. यासाठी भारतातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे 51 नेते आणि 85 राजदूतांची 7 शिष्टमंडळे 32 वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली जात आहेत. या 7 पैकी 2 शिष्टमंडळे बुधवारी(21 मे) परदेशात रवाना होत आहे. ही शिष्टमंडळे परदेशात पाकिस्तानचा खोटेपणा उघड करतील आणि जगाला पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा दाखवतील.