मुंबई - देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज अखेर त्यांचा मृत्यूसोबतचा संघर्ष संपला. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर, शरद पवारांनीही एक चांगला मित्र गमावल्याची प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली. प्रणवजी हे आदरणीय सहकारी, संसदेतील सहकारी आणि चांगले मित्र होते. आपल्या जबाबदारीतून ते कधीही मागे हटले नाहीत, सदैव देशहित डोळ्यसमोर ठेऊनच त्यांनी काम केलं. भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर पुत्र गमावल्याचे पवार यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रद्धांजली वाहिली.
माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी साहेबांच्या निधनानं भारतीय राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान्, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही देशाची, भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे. डॉ. मनमोहसिंह यांच्यासारख्या अर्थतज्ञ पंतप्रधानांच्या काळात देशाचं अर्थमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली होती. महत्वाच्या मुद्यांवर देशातील राजकीय नेतृत्वामध्ये समन्वय साधून प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आदरणीय प्रणवदांकडे होतं. त्यांचं निधन ही देशाची, महाराष्ट्राची, माझी व्यक्तिगत हानी आहे. देशाच्या या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण करताना, भारतमातेचा एक सेवक हरपला असे म्हटले आहे. फडणवीस यांनी शोक संदेशही लिहिला आहे.