मुंबई : भारतीय भांडवली बाजारातून उत्तम परतावा मिळत असल्यामुळे परदेशी वित्तीय संस्थांचा भारतातील वावर वाढला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिली.
सध्या भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे. गुंतवणूकदार भारतातून बाहेर का जात आहेत, असे विचारले असता सीतारामन म्हणाल्या, मुळात भारतात त्यांना गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळत असल्यामुळे ते इथे गुंतवणूक करत आहेत. त्यांच्या अपेक्षेनुसार परतावा मिळाल्यानंतर ते बाहेर पडत आहेत. पण, आता भांडवली गुंतवणुकीसाठी परदेशी गुंतवणूकदार भारताला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत आहेत.”
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यम व लघु श्रेणीतील उद्योगांसाठी सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सादर केली. या योजनेचे अनावरण करण्यासाठी सीतारामन सोमवारी मुंबईत आल्या होत्या. या अनावरणादरम्यान काही उद्योजकांना हमीपत्र देऊन या योजनेचे अनावरण करण्यात आले.
क्रेडिट गॅरेन्टी योजनेची व्याप्ती वाढण्याचे संकेत
एखादी बँक बंद पडली किंवा आर्थिक संकटात आली की बँकेवर अनेक निर्बंध येतात. मात्र, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेन्टी या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना बँकेतील ठेवीतून पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम प्राप्त होते. मात्र, पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम या योजनेअंतर्गत देण्याचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यंत्रसामग्री खरेदीसाठी सह-तारणाची गरज नाही
या योजनेंतर्गत कारखान्याची यंत्रसामग्री, उपकरणे आदींच्या खरेदीसाठी १०० कोटी रुपयांपर्यंत सह-तारणाची (कोलॅटरल) आता गरज भासणार नाही. दरम्यान, यावेळी भाववाढीच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, रिझर्व्ह बँकेच्या सहयोगाने सरकार या मुद्द्यावर प्राधान्याने काम करत असून, लवकरच भाववाढ आटोक्यात येईल.