जगभरातील भारतीयामुळे देशाला ओळख मिळाली - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: January 8, 2015 15:18 IST2015-01-08T13:31:06+5:302015-01-08T15:18:01+5:30
जगातील दोनशेहून अधिक देशात भारतीय नागरिकांचे वास्तव्य असून त्यांच्यामुळे भारताला जगाच्या नकाशावर ओळख मिळाली असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'प्रवासी भारतीय संमेलना' दरम्यान केले.

जगभरातील भारतीयामुळे देशाला ओळख मिळाली - नरेंद्र मोदी
ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. ८ - जगातील दोनशेहून अधिक देशात भारतीय नागरिकांचे वास्तव्य असून त्यांच्यामुळे भारताला जगाच्या नकाशावर ओळख मिळाली असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'प्रवासी भारतीय संमेलना' दरम्यान केले. तेराव्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनासाठी मूळचे भारतीय असलेले 'गुयाना'चे राष्ट्रपती डोनाल्ड रामोतार आपल्या पत्नीसह उपस्थित होते.
' संपूर्ण जग आज भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. भारताचे सामर्थ्य वाढले आहे. यापूर्वी आपले पूर्वज नवनव्या संधीच्या शोधात जगभरात गेले होते. मात्र आता अनिवासी भारतीयांना भारतात अनेक संधी उपलब्ध आहेत. जगाला देण्यासारखे भारताकडे खूप काही आहे,असे मोदी म्हणाले. तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते हे मला माहीत आहे, त्यामुळे जगातील काही देशांना आगमनानंतर व्हिसाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गांधींजींच्या विचारामुळे सर्व जगाला आज प्रेरणा मिळत असल्याचे सांगत मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचेही स्मरण केले. यावेळी त्यांनी प्रवासी भारतीयांना 'गंगा सफाई' मोहिमेत योगदान देण्याचेही आवाहन केले.
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
- जगातील २०० हून अधिक देशात भारतीयांचे वास्तव्य आहे. त्यांच्या रुपाने संपूर्ण भारतच विदेशात रहात आहे.
- जगभरात जेथे जेथे संधी उपलब्ध होती, तेथे तेथे भारतीय गेले आहेत. मात्र आता नव्या संधीच्या शोधात बाहेर जाण्याची गरज नाही, आता भारतातच तुम्हाला संधी मिळेल.
- १०० वर्षांपूर्वी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले आणि त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. जगभरातील लोकांना त्यांचे विचार प्रेरणादायी वाटतात. मॉरशिअसमध्ये आजही २ ऑक्टोबर रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते.
- आपली संस्कृती, मूल्य आणि संस्कारांमुळे जगभरात भारतीय नावाजले जातात, त्यांचा आदर व प्रशंसा केली जाते.
- जगाला देण्यासाठी भारताकडे खूप काही आहे.
- प्रवासी भारतीयांना जे वचन देण्यात आले होते ते पूर्ण करण्यात आले. पीईओ कार्ड धारकांना आजीवन व्हिसा देण्याचे वचन पूर्ण केले.
- प्रवासी भारतीयांना आता दर आठवड्याला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावण्याची गरज नाही.
- अनेक देशांसाठी व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा सुरू करण्यात आली आहे.