MEA on Bangladesh Violence:बांगलादेशातील ढासळती कायदा-सुव्यवस्था आणि अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे हल्ले यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या मयमनसिंह येथे दीपू चंद्र दास या हिंदू युवकाची करण्यात आलेली निर्घृण हत्या अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत, भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम सरकारला या प्रकरणी तातडीने न्याय देण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बांगलादेशचा भारत-विरोधी नॅरेटिव्ह पूर्णपणे फेटाळून लावला. "बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांना केवळ मीडियाची अतिशयोक्ती किंवा राजकीय हिंसा म्हणून दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही," असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले.
अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची भीषण आकडेवारी
रणधीर जायसवाल यांनी यावेळी एका धक्कादायक आकडेवारीचा दाखला दिला. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या तब्बल २,९०० हून अधिक घटनांची नोंद विविध स्वतंत्र स्त्रोतांकडून झाली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध पसरलेली शत्रुत्वाची भावना आणि हिंसाचार हा केवळ चिंतेचा विषय नसून, तो गंभीर आंतरराष्ट्रीय प्रश्न बनत असल्याचे भारताने सांगितले.
बांगलादेश सरकारची ही जबाबदारी
भारताने बांगलादेशला स्पष्ट शब्दात बजावले आहे की, आपल्या देशात कायदा-सुव्यवस्था राखणे आणि अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवणे ही पूर्णपणे तेथील अंतरिम सरकारची जबाबदारी आहे. मयमनसिंह येथील हत्येतील दोषींना लवकरात लवकर न्यायच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.
लोकशाही आणि मैत्रीसाठी भारत वचनबद्ध
एकीकडे बांगलादेशच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असतानाच, भारताने तेथील जनतेशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. "आम्ही बांगलादेशात शांतता आणि स्थैर्याचे समर्थक आहोत. बांगलादेशात स्वतंत्र, निष्पक्ष, सर्वसमावेशक आणि सहभागी निवडणुका व्हाव्यात, ही भारताची भूमिका कायम आहे," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले.
Web Summary : India expresses strong concern over attacks on minorities in Bangladesh. MEA cites 2,900+ incidents, urging justice after a Hindu youth's murder. India emphasizes Bangladesh's responsibility to protect minorities and maintain law, advocating for fair elections.
Web Summary : भारत ने बांग्लादेश में अल्पसंख्यकों पर हमलों पर कड़ी चिंता व्यक्त की। विदेश मंत्रालय ने 2,900 से अधिक घटनाओं का हवाला देते हुए, एक हिंदू युवक की हत्या के बाद न्याय की गुहार लगाई। भारत ने अल्पसंख्यकों की रक्षा और कानून बनाए रखने के लिए बांग्लादेश की जिम्मेदारी पर जोर दिया, निष्पक्ष चुनाव की वकालत की।