India China Faceoff: चीनविरुद्धच्या तणावात भारताला मिळणार 'ब्रह्मास्त्र'; जुन्या मित्रानं दिला शब्द
By कुणाल गवाणकर | Updated: November 12, 2020 19:15 IST2020-11-12T19:12:56+5:302020-11-12T19:15:09+5:30
India China Faceoff: भारत-चीनमधील तणाव वाढल्यास परिणाम संपूर्ण आशिया, युरोपवर

India China Faceoff: चीनविरुद्धच्या तणावात भारताला मिळणार 'ब्रह्मास्त्र'; जुन्या मित्रानं दिला शब्द
नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील तणाव गेल्या काही महिन्यांपासून कायम आहे. उन्हाळ्यापासून सुरू असलेला पूर्व लडाखमधील तणाव अद्यापही पूर्णपणे निवळलेला नाही. दोन्ही देशांनी सीमावर्ती भागातील फौजफाटा वाढवला आहे. भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाबद्दल जगभरातून चिंता व्यक्त झाली आहे. भारताचा जुना मित्र असलेल्या रशियानंदेखील आता भारत-चीनमधील वाढत्या कटुतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारत-चीन सीमेवरील तणाव वाढल्यास युरोप-आशिया खंडात अस्थिरता वाढेल, अशी भीती रशियाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
भारताला एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा लवकरच देण्यात येईल, असा शब्द रशियानं दिला आहे. रशियाचे उपमिशन प्रमुख रोमन बाबुश्किन यांनी भारत-चीनमधील तणावाबद्दल एका ऑनलाईन संवादातून चिंता व्यक्त केली. 'दोन्ही देशांमध्ये सकारात्मक संवाद गरजेचा आहे. जेव्हा बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्याचा मुद्दा येतो, त्यावेळी सन्मानजनक संवादचं मुख्य आयुध असतं,' असं बाबुश्किन म्हणाले.
जागतिक स्तरावर अनिश्चितता असताना भारत आणि चीनमधील तणाव वाढल्यास त्याचा परिणाम युरोप-आशिया खंडांमध्ये पाहायला मिळेल. या भागातील स्थिरतेला त्यामुळे बाधा पोहोचू शकेल. भारत-चीनमधील तणावाचा दुरुपयोग अन्य सक्रिय शक्तींकडून केला जाऊ शकतो आणि आम्ही तसे प्रयत्न होताना पाहिले आहेत, असं सूचक विधान बाबुश्किन यांनी केलं. आशियातल्या आमच्या दोन्ही मित्रांनी संवाद कायम राखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रोत्साहित करणं महत्त्वपूर्ण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.