भारताच्या प्रत्युत्तरात पाकमध्ये ८ जणांचा मृत्यू
By Admin | Updated: August 26, 2014 10:29 IST2014-08-26T10:21:50+5:302014-08-26T10:29:29+5:30
शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय सैन्याच्या छावण्या आणि सीमा रेषेवरील गावांवर हल्ला गोळीबार करणे पाकिस्तानलाच महागात पडले आहे.

भारताच्या प्रत्युत्तरात पाकमध्ये ८ जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय सैन्याच्या छावण्या आणि सीमा रेषेवरील गावांवर हल्ला व गोळीबार करणे पाकिस्तानलाच महागात पडले आहे. पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात गेल्या दहा दिवसांत पाकिस्तान सैन्यातील जवानांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १२ जण जखमी झाले आहेत.
जम्मू काश्मीरमधील भारत - पाक सीमा रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्या तुलनेत बीएसएफचे जवान अधिक सक्षम असून बीएसएफच्या जवानांकडील शस्त्रही पाकच्या तुलनेने चांगली आहेत. त्यामुळे बीएसएफने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचेच जास्त नुकसान होते अशी माहिती बीएसएफच्या एका अधिका-याने दिली आहे. गेल्यावर्षी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे १३ जवान शहीद झाले होते. यावर्षी आत्तापर्यंत भारताचा एक जवान शहीद झाला आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर यंदा भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील तीन जवान, तीन नागरिक आणि दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि बीएसएफचे महासंचालक डी..के. पाठक यांची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत गृहमंत्र्यांनी बीएसएफला पाठिंबा देत पाकला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे करताना सीमा रेषेवरील गावांमध्ये राहणा-या नागरिकांची काळजी घ्यावी अशी सूचनाही देण्यात आली आहे. 'पाक सैन्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देत असलो तरी त्यांच्या गावांमधील नागरिकांना आम्ही लक्ष करत नाही' असेही अधिका-याने सांगितले. तर भारतीय हद्दीतील गावांमधील रहिवाशांना दररोज रात्री पाकच्या हल्ल्याचा फटका बसणार नाही अशा सरकारी इमारती आणि शाळांमध्ये पाठवले जाते व सकाळी त्यांना पुन्हा गावात आणले जाते.