India Alliance News: लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवल्यानंतर दोन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाचे हादरे इंडिया आघाडीला बसू लागल्याचे दिसत आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाने काँग्रेसला दूर ठेवले, तर इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने काँग्रेसला बाजूला सारून अरविंद केजरीवालांना साथ दिली आहे. त्यात आता राजदचे नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या विधानाने इंडिया आघाडी फुटण्याच्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तेजस्वी यादव काय बोलले आहेत?
बक्सरमध्ये तेजस्वी यादव यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की, 'इंडिया आघाडी बनवत असताना असं ठरलं होतं की, ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही.'
जेव्हा तेजस्वी यादव यांना विचारण्यात आले की, दिल्लीत निवडणूक प्रचाराला जाणार आहात का? त्यावर ते म्हणाले, 'याबद्दल अजून काही ठरलेलं नाही. पुढचं पुढे बघू. पण, बिहारमध्ये आम्ही एकत्र असू."
काँग्रेसकडील नेतृत्वावरून नाराजी
सलग दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. काँग्रेसमधील असमन्वयामुळे मित्रपक्षांनाही फटका बसल्याचे प्रामुख्याने अधोरेखित केले गेले.
दोन राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल असमाधान व्यक्त करण्यात आले. ममतांनी इंडिया आघाडीचे प्रमुख व्हावे म्हणून लाल प्रसाद यादवांनी पाठिंबा दिला.
इतकंच नाही, तर उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या पक्ष असलेल्या अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीकडून काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली गेली. केजरीवालांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशावरून थेट टीका करत काँग्रेससोबत आघाडी न करण्याची घोषणा केली होती.
गेल्या काही महिन्यात इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडूनच काँग्रेसबद्दल नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यात आता तेजस्वी यादवांनी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबद्दल सूचक विधान केले. तसेच इंडिया आघाडी लोकसभेपुरती होती, असे म्हटल्याने नवा मुद्दा चर्चेत आला आहे.