लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: बिहारमधील मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण आणि 'मतचोरी'च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. 'इंडिया' आघाडीने सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यावर विचार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत, मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊनही विरोधकांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली नाहीत, यावर सविस्तर चर्चा झाली. काही खासदारांनी हा मुद्दा अधिक गांभीर्याने घ्यावा आणि थेट महाभियोग प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली. आयोगाने प्रश्नांची उत्तरे न दिल्याने ही लढाई सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेत मत चोरीचे आरोप फेटाळले होते. विरोधकांचे आरोप खोटे असल्याचे आयोगाने म्हटले होते. तर एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मतदार यादीतून हटवलेली ६५ लाख नावे वेबसाइटवर अपलोड करण्यात आली.
लोकशाही मार्गाने लढण्याचा निर्धार
महाभियोग प्रस्तावावर काँग्रेस नेते नसीर हुसैन यांनी सांगितले की, आम्ही लोकशाही पद्धतीचा वापर करूनच यावर तोडगा काढू. आयोगाने लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंका दूर करणे अपेक्षित आहे. मृत व्यक्तींच्या नावांचा समावेश आणि इतर मुद्द्यांवर आयोगाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. हुसैन पुढे म्हणाले की, आयोग सध्या भाजप प्रवक्त्यासारखे काम करत आहे. देशाला निष्पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाची गरज आहे. जर गरज पडली, तर संसदीय लोकशाहीमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रक्रियेचा वापर करण्यास आम्ही तयार आहोत.
संसद अधिवेशनादरम्यान, काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सपा, टीएमसी व 'इंडिया'च्या खासदारांनी बिहारमधील एसआयआरविरोधात निदर्शने केली.
उपराष्ट्रपतिपदासाठी ‘इंडिया’चा उमेदवार?
सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीने उपराष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार देण्यावर चर्चा झाली. बैठकीत इस्रोच्या शास्त्रज्ञासह बिहार व तामिळनाडूतील उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यात आली. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खरगे यांच्यासह विरोधकांशी संपर्क साधून ही निवडणूक एकमताने करण्याचे आवाहन केले आहे.