भारतात मधुमेहाची १२३ टक्के वाढ
By Admin | Updated: June 16, 2015 02:41 IST2015-06-16T02:41:02+5:302015-06-16T02:41:02+5:30
भारतात गेल्या दोन दशकापासून मधुमेह हा मुख्य रोग बनला असून, १९९० ते २०१३ या कालावधीत जगात मधुमेह ४५ टक्क्याने वाढला असताना

भारतात मधुमेहाची १२३ टक्के वाढ
नवी दिल्ली : भारतात गेल्या दोन दशकापासून मधुमेह हा मुख्य रोग बनला असून, १९९० ते २०१३ या कालावधीत जगात मधुमेह ४५ टक्क्याने वाढला असताना, भारतात मात्र तो १२३ टक्के वाढलेला दिसत आहे.
भारतात महिला व पुरुषात सारख्याच धोकादायक ठरलेल्या या रोगामुळे स्थूलता, झोपमोड, युरीन इन्फेक्शन, हृदयविकार असे अनेक रोग होऊ शकतात. वॉशिंग्टन विद्यापीठातील हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन या विभागाने जागतिक पातळीवर हा अभ्यास केला असून निष्कर्ष काढला आहे. १८८ देशांतील ३०१ तीव्र रोग व पारंपरिक रोग व जखमा यांचा यात अभ्यास करण्यात आला आहे. गेल्या काही दशकांत विकसित देशात मधुमेहाचा प्रसार हा चिंतेचा विषय होता; मात्र आता भारत, चीन, मेक्सिको या विकसनशील देशांतही हाच रोग हातपाय पसरत असल्याचे दिसत आहे. मधुमेहाच्या सर्वच प्रकारांची वाढ होत असली तरीही टाईप २ मधुमेह जास्त वाढताना दिसत आहे. या मधुमेहाचे मुख्य कारण स्थूलता हे आहे. भारतातील युवा पिढीच्या खाण्याच्या व झोपण्याच्या सवयी बदलत असून शारीरिक हालचाली कमी होत आहेत. त्यामुळे या मधुमेहाचा शिरकाव होताना दिसत आहे असे फोर्टिस-सीडॉक फॉर डायबेटिसमधील एन्डोक्रिनॉलॉजिस्ट डॉ. अनुप मिश्रा यांनी म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)