भ्रष्टाचारात भारत ८५ वा
By Admin | Updated: December 3, 2014 12:51 IST2014-12-03T12:51:07+5:302014-12-03T12:51:07+5:30
जगातील सर्वाधिक भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा ८५ वा क्रमांक लागला असून या यादीमध्ये एकूण १७५ देशांचा समावेश आहे.

भ्रष्टाचारात भारत ८५ वा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - जगातील सर्वाधिक भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा ८५ वा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली असली तरी भारताने भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी भ्रष्टाचारासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला जातो. मंगळवारी जर्मनीत या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालात १७५ देशांमधील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. गेल्या वर्षी भ्रष्ट देशांच्या भारत ९४ व्या स्थानावर होता. आता भारताच्या कामगिरीत काही अंशी सुधारणा झाली असून भारत ८५ व्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने भारताच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भ्रष्टाचाराविरोधात जनतेमध्ये संताप असूनही त्यावर लगाम लावण्यात अपयश येत असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारताचा शेजारी राष्ट्र चीनमध्येही भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची घोषणा केली जात असली तरी या देशामधील भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी चीन ८० व्या स्थानावर होता. यंदा हा देश थेट १०० व्या क्रमांकावर घसरला आहे. या क्रमवारीत पाकिस्तान १२६, अमेरिका १७, युनायटेड किंगडम १७ व्या स्थानावर आहे.
सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले अव्वल ५ देश
> डेन्मार्क
> न्यूझीलंड
> फिनलँड
> स्वीडन
> नॉर्वे
सर्वाधिक भ्रष्टाचार असलेले ५ देश
> सोमालिया
> उत्तर कोरिया
> सूदान
> अफगाणिस्तान
> दक्षिण सुदान