Income Tax News: ऊसाचा रस विकून दिवसाला ५०० ते ६०० रुपये कमावणाऱ्या एका व्यक्तीला आयकर विभागाने कर न भरल्याबद्दल नोटीस पाठवली. ही नोटीस जेव्हा या रसवंती चालवणाऱ्या व्यक्तीला मिळाली, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ही रक्कम होती ७.८ कोटी रुपये!
ज्या व्यक्तीला आयकर विभागाने ७.८ कोटी रुपये टॅक्स भरण्याची नोटीस पाठवली आहे, त्या व्यक्तीचे नाव आहे रईस अहमद. ते अलिगढमध्ये रसवंती चालवतात. पाचशे ते सहाशे रुपये इतकी त्यांची दिवसाची कमाई आहे. पण, ७.८ कोटी रुपये टॅक्स भरण्याची नोटीस बघून त्यांचं ब्लड प्रेशरच वाढलं.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणे काय?
रईस अहमद यांना टपालद्वारे ही नोटीस मिळाली. त्यांना २८ मार्चपर्यंत उत्तर देण्यासही सांगण्यात आले. त्यामुळे रईस अहमद यांनी आयकर विभागाच्या स्थानिक कार्यालयात धाव घेतली. तिथे त्यांनी अधिकाऱ्यांकडे या नोटीसबद्दल चौकशी केली.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तुमच्या (रईस अहमद) पॅन कार्डवरून मोठ्या रकमांचे व्यवहार झाले आहेत. त्यावर रसवंतीवाल्याने अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने असे कोणतेही मोठ्या रकमांचे व्यवहार केले नाहीत.
अलिगढ आयकर विभागातील अधिकारी नैन सिंग यांनी सांगितले की, आम्ही त्यांना (रईस अहमद) सांगितले की, जर तुमचा पॅन नंबर गैरवापर झाला असेल, तर तुम्ही तशी तक्रार पोलीस ठाण्यात द्या.
पोलीस ठाण्यात पॅनचा गैरवापर झाल्याची तक्रार
आयकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आता रईस अहमद यांनी पॅन नंबरचा गैरवापर झाल्याची तक्रार दिली. सिव्हील लाईन पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. पण, इतकी मोठी रक्कम भरण्याची नोटीस आल्यामुळे रईस अहमद यांना मोठा धक्का बसला आहे.