उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात अजब प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे संपूर्ण गावात दहशत पसरली आहे. भैसहापूर गावात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलगी रिया मौर्यला एका महिन्यात ६ वेळा सापाने चावा घेतला आहे. २२ जुलै २०२५ रोजी शेतात जाताना पहिल्यांदा रियाला सापाने चावले असं तिचे वडील राजेंद्र मोर्य यांनी दावा केला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारानंतर ती बरी झाली परंतु हा दिलासा जास्त दिवस टिकला नाही.
१३ ऑगस्टला पुन्हा एकदा रियाला सापाने चावले. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला प्रयागराज नेण्यात आले. तिथे खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार केले गेले. दुसऱ्यांदा सापाने चावूनही ती मृत्यूच्या दाढेतून परतली. त्यानंतर २७ ते ३० ऑगस्ट या काळात तिला सापाने चार वेळा चावले. कधी आंघोळ करताना तर कधी घरात काम करताना या घटना घडल्या. मुलीच्या उपचारासाठी जमा केलेले सर्व पैसे संपले. मजबुरीत आता त्यांना मांत्रिकाचा आधार घ्यावा लागला असं पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले.
तर चावणारा साप खूप मोठा होता, गडद काळ्या रंगाचा होता असं पीडित रियाने सांगितले. साप चावल्यानंतर ती १ तास बेशुद्ध पडली होती. जेव्हा शुद्ध आली तेव्हा कधी हॉस्पिटलच्या बेडवर तर कधी मांत्रिकाकडे होती. सातत्याने साप चावण्याच्या घटना घडत असल्याने रिया आणि तिचे भाऊ-बहीण आजीच्या घरी गेले आहेत. आता रियाचे कुटुंब इथून घर सोडण्याचा विचार करत आहेत. या घटनेबाबत सिराथू सामुहिक आरोग्य केंद्राचे अधिकारी अखिलेश सिंह यांनीही पुष्टी केली. रियाला ३ वेळा हॉस्पिटलला आणले होते. प्रत्येकवेळी तिच्या पायावर साप चावल्याच्या खुणा आढळल्या. तिला एंटी वेनम डोस दिला होता. २ वेळा तिला जिल्हा रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या होत्या असं डॉक्टरांनी म्हटलं.
दरम्यान, वारंवार एकाच मुलीला सापाने चावल्याची घटना हैराण करणारी आहे. गावातील लोक या घटनेने दहशतीत आहे. साप दिसल्यानंतर वन विभागाला आणि प्रशासनाला कळवले तरीही कुणीही सापाला पकडायला आले नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला. ही घटना संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहे. अखेर प्रशासनाला कधी जाग येणार आणि पीडित कुटुंब दहशत आणि संकटातून बाहेर येणार हा प्रश्न कायम आहे.