“तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 07:21 PM2023-10-03T19:21:43+5:302023-10-03T19:21:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तेलंगणमधील रॅलीत मोठा गौप्यस्फोट; NDA मधील प्रवेश नाकारण्याचे कारणही सांगितले.

in nizamabad telangana rally pm narendra modi said kcr wanted to join nda but i refused his entry | “तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार

“तुम्ही महाराजा लागून गेलात का”; KCR यांचा NDA प्रवेशाचा मानस, पण PM मोदींचा ठाम नकार

googlenewsNext

PM Narendra Modi Telangana Visit: आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी देशातील काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात तेलंगण राज्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी सुरू केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाला भेट दिली. निजामाबाद येथे एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी मोठा गौप्यस्फोट केला. के. चंद्रशेखर राव हे NDA मध्ये येण्यास इच्छूक होते. मात्र, मीच नको म्हटले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

मी केसीआर यांना एनडीएमध्ये प्रवेश नाकारला. केसीआर दिल्लीत आल्यानंतर मला भेटले होते. मला एनडीएचा भाग व्हायचे आहे, असे ते म्हणाले. मात्र, KTR यांना तुम्ही आशीर्वाद द्यावे, अशी त्यांचे म्हणणे होते. त्याचवेळी मी त्यांना म्हणालो की, तुम्ही राजा-महाराजा लागून गेलात का? सरकार कोणाचे असावे, याचा निर्णय जनता घेईल, असा मोठा गौप्यस्फोट पंतप्रधान मोदी यांनी या सभेवेळी केला. तेलंगणातील जनतेसाठी ८ हजार कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा करण्यात आली असून, काही योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते निजामाबाद येथे करण्यात आले. 

तेलंगणात विविध योजनांसाठी ८ हजार कोटी 

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तेलंगणात NTPC च्या सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या पहिल्या ८०० मेगावॅटचे पहिले युनिट राष्ट्राला समर्पित केले जाईल. यामुळे तेलंगणला कमी किमतीत वीज मिळेल. राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. देशातील सर्वात पर्यावरणपूरक वीज केंद्रांपैकी हे एक असेल. मनोहराबाद आणि सिद्धीपेट यांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गासह रेल्वे प्रकल्पांचे पंतप्रधान मोदी यांनी लोकार्पण केले.  याशिवाय धर्माबाद-मनोहराबाद आणि महबूबनगर-कुरनूल दरम्यान विद्युतीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला.

रेल्वे मार्गांमुळे आर्थिक विकासाला चालना

७६ किमी लांबीच्या मनोहराबाद-सिद्दीपेट रेल्वे मार्गामुळे या प्रदेशाच्या विशेषतः मेडक आणि सिद्धीपेट जिल्ह्यांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल. धर्माबाद-मनोहराबाद आणि महबूबनगर-कुरनूल दरम्यानच्या विद्युतीकरण प्रकल्पामुळे रेल्वेच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होईल. भारतीय रेल्वेने पुढील काही महिन्यांत सर्व रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या ९ वर्षात समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

दरम्यान, गेल्या ९ वर्षांपासून परवडणारी आरोग्यसेवा देण्यासाठी काम करत आहोत. देशभरात एम्स रुग्णालयांची संख्या वाढवली जात आहे. तेलंगणातही एम्सचे काम सुरू आहे. आज जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्मान भारत भारतात सुरू आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 


 

Web Title: in nizamabad telangana rally pm narendra modi said kcr wanted to join nda but i refused his entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.