Velamati Chandrasekhar Janardhan Rao News: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये उद्योगजगताला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. वेलजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक वेलामाती चंद्रेशखर जनार्दन राव यांची हत्या करण्यात आली. राव यांची राहत्या घरात चाकून ७० पेक्षा अधिक वेळा भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, राव यांच्या नातवाला अटक करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
८६ वर्षीय वेलामाती चंद्रशेखर जनार्दन राव यांची हत्या त्यांच्याच नातवा केली. २९ वर्षीय नातवाने राव यांच्यावर ७० पेक्षा अधिक वेळा चाकूने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. ६ फेब्रुवारी रोजी रात्री सोमाजीगुडा येथील राव यांच्या घरात ही घटना घडली.
संपत्तीच्या वाटणीवर झाला वाद
समोर आलेल्या माहितीनुसार, राव यांची हत्या त्यांचा २९ वर्षीय नातू किलारू कीर्ति तेजा याने केली. संपत्तीची वाटणी व्यवस्थित केली नाही, म्हणून किलारूने राव यांच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर किलारू कीर्ति याने रागाच्या भरात चाकूने राव यांच्यावर सपासप वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किलारू कीर्ति तेजाने राव यांच्यावर ७० हून अधिक वार केले.
राव यांची मुलगी हल्ल्यात गंभीर जखमी
राव आणि किलारू कीर्ति तेजा यांच्यात वाद झाला. त्यानंतर तेजाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यावेळी राव यांची मुलगी आणि तेजाची आई सरोजिनी देवी यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, या झटापटीत त्याही गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सरोजिनी देवी यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेजा अमेरिकेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करून अलिकडेच हैदराबादला आला होता. पोलिसांनी तेजाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ८ फेब्रुवारी रोजी तेजाला अटक करण्यात आली.
राव यांचे अनेक क्षेत्रात योगदान
जनार्दन राव यांचे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठं योगदान आहे. जहाज बांधणी, ऊर्जा आणि औद्योगिक उपकरणे यासह इतर क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे.