सुधारित-पंजाबात हालअलर्टनंतरही दहशतवाद्यांनी साधला डाव

By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:03+5:302016-01-03T00:05:03+5:30

हल्ला उधळून लावल्याचा हवाईदलाचा दावा: सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Improved- terrorists attacked Punjab after recent Alert | सुधारित-पंजाबात हालअलर्टनंतरही दहशतवाद्यांनी साधला डाव

सुधारित-पंजाबात हालअलर्टनंतरही दहशतवाद्यांनी साधला डाव

्ला उधळून लावल्याचा हवाईदलाचा दावा: सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पठाणकोट: लष्करी पोषाखात असलेल्या चार ते पाच संशयित दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री पंजाबमधील गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांचे अपहरण केल्यावर संपूर्ण पंजाबमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. परंतु त्यानंतरही दहशतवादी हवाई तळापर्यंत पोहोचलेच कसे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दहशतवादी देशात घुसले असल्याचे संकेत मिळाल्यावरही सुरक्षा व गुप्तचर यंत्रणा त्यांना रोखण्यात अपयशी ठरली आहे. दुसरीकडे हवाईदलाने मात्र गुप्तचर यंत्रणेची तत्परता आणि तात्काळ कारवाईने दहशतवाद्यांचा हल्ला उधळून लावण्यात आम्हाला यश आले आणि पठाणकोटमधील तळ आम्ही वाचवू शकलो, असे म्हटले आहे.
दरम्यान पठाणकोट हवाईदल तळावरील हल्ल्याचा तपास राष्ट्रीय अन्वेषण संस्थेकडे (एनआयए) सोपविण्यात येणार आहे.
गुरुवारी रात्री घडलेली घटना आणि शनिवारच्या हल्ल्याचा थेट संबंध असल्याचे संकेत मिळाले आहेत. पाकिस्तानच्या सीमेपासून १५ किमी अंतरावर पाच जणांनी पोलीस अधीक्षकाच्या वाहनावर कब्जा मिळवीत ते पठाणकोटच्या दिशेने नेले. काही अंतरावर गेल्यावर सलविंदरसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाहनातून फेकून देण्यात आले. धिरा गावाजवळ दहशतवादी हे वाहन तेथेच सोडून निघून गेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरूझाले होते. तसेच राज्यभरात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी लष्करप्रमुख आणि आयबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी यासंदर्भात अनेक बैठका घेतल्या. एवढेच नाहीतर संभाव्य हल्ला रोखण्याकरिता राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) काल रात्रीच पठाणकोटमध्ये डेरेदाखल झाले होते. परंतु त्यानंतर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास हे दहशतवादी हवाईदल तळावर हल्ला करण्यात यशस्वी ठरले.
एनआयएचे पथक पठाणकोटमध्ये
दरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तपास करण्याकरिता राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे पथक (एनआयए) सकाळीच पठाणकोट हवाईदल तळावर पोहोचले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सोपविली जाण्याची शक्यता असून गृहमंत्रालयाने त्यादृष्टीने पथक सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्लीत सुरक्षा वाढविली
पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. दुसरीकडे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी आज दिल्लीतील अनेक पर्यटन स्थळांचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सकाळी ११ वाजता ते कुतुबमिनारला गेले. परंतु तेथील सुरक्षा व्यवस्थेवर ते समाधानी नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. त्यांनी लालकिल्ल्यालाही भेट दिली.
पर्रीकरांनी केली एसएसए व तीनही दलांच्या प्रमुखांशी चर्चा
हल्ल्यानंतर तातडीने दिल्लीत पोहोचलेले संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी पठाणकोट दहशतवादी हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीला तीनही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव उपस्थित होते.
कुठल्याही हल्ल्याचे सडेतोड उत्तर देऊ-गृहमंत्री
नवी दिल्ली: भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत. परंतु अशा कुठल्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल,असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिला आहे.
दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, शेजाऱ्यांसोबत आम्हाला शांतीपूर्ण संबंध हवे आहेत. परंतु भारतावरील दहशतवादी हल्ला आम्ही कदापि सहन करणार नाही. दहशतवादी हल्ला परतवून लावण्यात सुरक्षा दल, सेना, निमलष्करी दलाचे जवान आणि पंजाब पोलिसांनी दाखविलेल्या शौर्याची त्यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधानांच्या पाक योजनेसाठी मोठे आव्हान-उमर अब्दुल्ला
श्रीनगर: हवाई दल तळावरील दहशतवादी हल्ल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानबाबत योजनेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. चर्चेच्या प्रक्रियेला तडा जाऊ नये यासाठी भाजपाला वाटाघाटी आणि दहशतवादावरील आपल्या भूमिकेच्या पलिकडे जाऊन विचार करावा लागेल, असे मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
उमर यांनी हल्ल्याबाबत टिष्ट्वट करताना सांगितले की, हे अचानक घडले. पंतप्रधानांच्या धाडसी पाकिस्तान योजनेपुढील हे मोठे आव्हान आहे. पण भाजपाला आता दहशतवाद आणि चर्चा एकसाथ होऊ शकत नाही ही आपली भूमिका बदलावी लागणार आहे.

हल्ल्याने चिंता वाढली-काँग्रेस
आजच्या हल्ल्याने पंजाबमधील सुरक्षा स्थितीबाबत चिंता वाढली आहे. कारण सुमारे २० वर्षांच्या शांतीनंतर पुन्हा राज्यात अशाप्रकारच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे, अशी साशंकता काँग्रेसने जाहीर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडील लाहोर दौऱ्यानंतर घडलेल्या या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करताना पंतप्रधान शेजारील देशातील आपल्या समकक्षांसोबत हा मुद्दा उपस्थित करणार काय? असा सवाल या पक्षाने केला.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, राज्यात गेल्या २० वर्षांपासून दहशतवादी कारवाया बंद असताना दोन दहशतवादी हल्ले का झाले? एवढेच नाहीतर उधमपूरमध्ये झालेला तिसरा हल्ला सुद्धा पंजाब आणि जम्मू-काश्मीर सीमेजवळ झाला होता.

दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकू नये-भाकपा
भाकपाने पठाणकोट हल्ल्याची निंदा करताना भारत आणि पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या चिथावणीला बळी पडून द्विपक्षीय शांतीवार्तेतून माघार घेऊ नये,असे आवाहन केले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय सचिव डी.राजा यांनी सांगितले की, आम्ही या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा करतो. पंतप्रधानांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर हा हल्ला झाला आहे. उभय देशांनी चर्चेची प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी घेतलेला पुढाकार निष्फळ ठरविण्याचा प्रयत्न या हल्ल्यातून झाला आहे.

पाकिस्तानने थेट आमच्या मायभूमीवर केलेला हा हल्ला आहे आणि त्याला आम्ही सुद्धा सडकून प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही भारतात गोंधळ माजवू शकत नाही आणि असे करुन स्वत:ला वाचून शकणार नाही.
सुखबीरसिंग बादल
उपमुख्यमंत्री, पंजाब


पंजाबमध्ये सहा महिन्यातील दुसरा दहशतवादी हल्ला
पंजाबमध्ये गेल्या सहा महिन्यात झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
राज्यात २००१ ते २०१६ या कालावधीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा घटनाक्रम
१ मार्च २००१- पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर १३५ यार्ड (गज) लांबीचा बोगदा सापडला होता.
१ जानेवारी २००२- हिमाचल प्रदेशलगतच्या पंजाब सीमेवर दहशतवाद्यांच्या एका गटाने दमतलमधील फायरिंग रेंजवर हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन जवान शहीद तर पाच जखमी झाले होते.
३१ जानेवारी २००२- पंजाब परिवहनच्या बसमध्ये झालेल्या स्फोटात दोन जण ठार तर १२ जखमी झाले होते. हा स्फोट होशियारपूर जिल्ह्याच्या पटरानामध्ये झाला होता.
३१मार्च २००२- फिरोजपूर-धनबाद एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण ठार तर २८ जखमी झाले होते. लुधियानापासून २० किमी अंतरावर दरोहा येथे हा स्फोट झाला होता.
२८ एप्रिल २००६- जालंधर बसस्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटात किमान ८ जण लोक जखमी झाले होते.
१४ ऑक्टोबर २००७- लुधियानातील एका चित्रपटगृहात झालेल्या बॉम्बस्फोटात १० वर्षाच्या एका बालकासह ७ जण ठार तर अन्य ४० जखमी झाले होते.
२७ जुलै २०१५- गुरुदासपूर जिल्ह्यात पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पंजाब पोलिसांच्या एका अधीक्षकासह ७ जण मृत्युमुखी पडले होते. प्रत्युत्तरातील कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
२ जानेवारी २०१६- पठाणकोटच्या हवाईदल तळावर दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले.


Web Title: Improved- terrorists attacked Punjab after recent Alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.