सुधारित: सेवागिरी रथोत्सवात भरला भक्तीचा मेळा
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:20+5:302014-12-20T22:27:20+5:30
पुसेगाव यात्रा : माजी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत निघाली शाही मिरवणूक

सुधारित: सेवागिरी रथोत्सवात भरला भक्तीचा मेळा
प सेगाव यात्रा : माजी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत निघाली शाही मिरवणूकपुसेगाव : सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात बेलफुल गुलालाची उधळण करत भक्तिमय व उत्साही वातावरणात श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव आज, शनिवारी उत्साहात झाला. यावेळी महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांमधील सुमारे ८ लाख भाविकांनी पुसेगाव सुवर्णनगरीत हजेरी लावली. मंगळवारी पहाटे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, ॲड. विजयराव जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटे फुलांनी सजवलेल्या मानाच्या रथामध्ये श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते सकाळी दहाला मानाच्या रथाचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, बाळासाहेब सोळस्कर उपस्थित होते. यावेळी टाळ-मृदगांच्या गजरात ढोल-ताशे व बँडपथकाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीच्या अग्रभागी गजराज आणि अश्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. दर्शनाला येणारे भाविक नारळ, बेलफुल, पुष्पहार, पेढे व नोटांच्या माळा रथावर अर्पण करीत होते. भाविकांनी श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मंदिर ते यात्रास्थळ (मुख्य रस्ता), पोस्ट कार्यालय मार्गे मंदिर अशी बारा ते चौदा तास रथ मिरवणूक झाली. रथयात्रा संपल्यानंतर रथावरील देणगी रक्कम पोलीस बंदोबस्तात एकत्र करून नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. (वार्ताहर)चौकट :फ्लेक्समुक्त यात्राजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केलेल्या आवाहनाला पुसेगाव ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन यावर्षी प्रथमच फ्लेक्समुक्त सेवागिरी यात्रा साजरी केली. देवस्थान ट्रस्टव्यतिरिक्त कोणाचेच फलक नसल्याने यात्रेकरूंमधून कौतुक झाले. रथाभोवती तसेच दर्शनरांगेवर व गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने सीसीटी कॅमेरे व स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली.फोटो:२० सातारा०१सेवागिरी रथोत्सव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शनिवारी पुसेगाव (ता. खटाव) येथे उत्साहात झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार जयकुमार गोरे, ॲड. विजय कणसे आदी उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)