पोलीस ठाण्यांमध्ये लवकरच पाळणाघर
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30

पोलीस ठाण्यांमध्ये लवकरच पाळणाघर
>जळगाव : महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात बालसंगोपन केंद्र व पाळणाघर तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करुन तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांनी पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे केल्या आहेत. येथील पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पत्र पाठवून विभागाच्या उपअधीक्षकांमार्फत प्रस्ताव मागविले आहेत. पोलीस दलात महिला कर्मचार्यांची संख्या मोठी आहे. महिलांना प्रसुतीसाठी शासनाने काही दिवस सुटीचे निर्धारीत केले आहे. मात्र या सुटीचीही मर्यादा आहे. बाळासा घरी सोडून नोकरी करणे शक्य होत नाही. ही गैरसोय दूर व्हावी, यासाठी पोलीस महासंचालकांनी पोलीस ठाण्यातच एक खोली बांधून पाळणाघरात असलेल्या सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिला अधिकारी-कर्मचार्यांना कर्तव्य बजावून आपल्या बाळाकडेही लक्ष देता येणार आहे. (प्रतिनिधी)